बुलढाणा: कोसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील डोणगाव नजीकच्या कांचनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे सोमवारी, १८ ऑगस्टला डोणगावमध्ये पाणीच पाणी चोहीकडे असे भीषण चित्र दिसून आले. गावाला पाण्याचा वेढा पडला असून डोणगाव ते वाशीम दरम्यानची वाहतूक ठप्प पडली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहने व प्रवासी अडकून पडले आहे.
बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव शिवारामध्ये काल रविवार, १७ ऑगस्टच्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळीदेखील संततधार सुरु असल्याने परिसरातून वाहणाऱ्या कांचनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. पुलावरून नदीचे पाणी वेगाने वाहत असल्याने मेहकर वाशिम राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. डोणगावला पाण्याचा वेढा पडला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झाले. आजही रिमझिम पाऊस सुरू असल्याने पूर अजूनही कायम आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिकांची नासाडी झाली आहे.
चौदा प्रकल्प तुडुंब, चौदा गावांना धोका
दुसरीकडे मुसळधार पावसामुळे व धरण क्षेत्रातही जोरदार पावसामुळे सात लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे १४ गावांना धोक्याचा व सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.