बुलढाणा: सोशल मीडियावर काही महाभाग काय पराक्रम करतील याचा नेमच नाही. अनेक उपद्व्याप करून असे भामटे अनेकांच्या डोकेदुखीला कारणीभूत ठरतात. याला सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीदेखील अपवाद ठरत नाही.

अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने तब्बल ८ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला सोशल मीडिया रिलस्टारचे बनावट (फेक) फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावरुन त्याने अनेक महापुरुषांबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट ) टाकला. धार्मिक भावना भडकवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र यामुळे आठ लाख चाहते (फॉलोअर्स) असलेल्या रिलस्टारला मोठा मनस्ताप झाला. या आरोपीवर बुलढाणा सायबर पोलिसांनी कारवाई केली आह आहे.

मागील २७ जून रोजी अज्ञात आरोपीने बुलढाणा जिल्ह्यातील एंजेलीना (नाव बदललेले, वय २८ वर्ष) या रिलस्टार महिलेचे फेक फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावर महापुरुषांबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट करुन धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारीत केली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्याविरुद्ध टीकेची झोड उठविली. सदर रिलस्टारने सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे धाव घेवून तक्रार दिली. यावरून बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, तसेच आर/ डबल्यू ६६ (सी) आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सायबर पोलिसांनी त्वरीत सदरची आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्याची कारवाई केली.

सायबर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने सखोल तपास केला. पीडित रिलस्टार महिलेचे फेक फेसबुक अकाउंट तयार करुन त्यावर महापुरुषांबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट करुन धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारीत करणारा आरोपी निष्पन्न केला. आरोपी निलेश सुनिल सोनार (वय २६ वर्ष राहणार,भुसावळ जिल्हा जळगाव) असे या उचापती करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर, पोलीस हवालदार कुणाल चव्हाण, पोलीस जमादार संदीप राऊत, विक्की खरात यांनी केली.