बुलढाणा : मैत्रीपूर्ण लढतीचे ट्वीटटद्वारे संकेत देणारे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ व महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात दिलजमाई झाली असून आम्ही एकदिलाने खेडेकर यांचा प्रचार करणार असल्याची ग्वाही सपकाळ यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खेडेकर गुरुवारी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच्या पूर्वसंध्येला ही दिलजमाई झाल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून खेडेकर यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) यांनी ‘एक्स’वरून आघाडीतील बिघाडी दर्शविणारे ट्वीट करीत ३१ मार्चला खळबळ उडवून दिली होती. सपकाळ यांच्या ‘ट्वीट’मध्ये “राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर बुलढाण्यात काय…?” असा मजकूर होता. त्यात दोन मल्ल झुंजत असल्याचे सूचक चित्रही होते. हे ट्विट करून सपकाळ यांनी आपले मोबाईल बंद करून टाकले होते. यावर कळस म्हणजे त्याच दिवशी (रविवारी) आयोजित आघाडीचा मेळावा अर्धा संपत आला तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे व अन्य पदाधिकारी मेळाव्याकडे फिरकलेच नव्हते. यामुळे मेळावा सोडून खेडेकर हे आमदार नितीन देशमुख यांच्या समवेत काँग्रेस कार्यालयात आले. त्यांनी काँग्रेस नेत्यांना मेळाव्यात येण्याची विनवणी केली होती. यामुळे आघाडीतील प्रामुख्याने या दोन पक्षांतील बिघाडी समोर आली होती.

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

या पार्श्वभूमीवर ठाकरे गट व काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशांती या दोघा नेत्यांत दिलजमाई झाली. आज बुलढाण्यात पार पडलेल्या काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत याचे प्रत्यंतर दिसून आले. या बैठकीत खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनीही हजेरी लावली. हा मेळावा संपल्यावर सपकाळ, खेडेकर व बुधवत यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – “काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

आघाडी धर्म पाळणे कर्तव्यच – सपकाळ

आज संध्याकाळी पार पडलेल्या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी आघाडीत बिघाडी नसल्याचे निक्षून सांगितले. मी केलेले ‘ट्वीट’ शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर ही जागा शिवसेनेला मिळाली. त्यामुळे खेडेकर यांचा प्रचार करणे आणि आघाडी धर्म पाळणे आमचे कर्तव्यच असल्याचे ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana lok sabha friendship between narendra khedekar and harshvardhan sapkal first a friendly match tweet now just friendship scm 61 ssb
First published on: 03-04-2024 at 19:09 IST