बुलढाणा: जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर येथे एक नाट्यमय घटना घडली. दोन दशकानंतर ‘ते ‘ गावात परतल्याने समस्त सोयरे, गावकरी आनंदाने नाचले.
अवचित मोरखेडे असे या व्यक्तीचे नाव आहे. अर्थात ते कुठे यात्रेत, कुंभमेळ्यात हरवले नव्हते. घरगुती वादापायी अन रागाच्या भरात त्यांनी तब्बल वीस वर्षांपूर्वी आपले घर सोडले. विदर्भ सोडला, महाराष्ट्र सोडला अन थेट गुजरात राज्य गाठले. तिथून मोरखडे यांच्या आयुष्यात सुरु झाला अविरत संघर्ष. ‘रहनेको घर नही सोनेको बिस्तर नही, अपना तो खुदा है रखवाला ‘ या हिंदी गाण्याप्रमाणे परिस्थिती. दोन वर्षे बडोदा शहराच्या फुटपाथवर राहून मिळेल ती कामे, मजुरी करून पोट भरले.
अविश्रांत मेहनतीची तयारी, काही तरी करून दाखविण्याची जिद्द, निर्धार याला चांगल्या स्वभावाची जोड मिळाली. त्यादरम्यान भेटलेले काही चांगले मित्र यामुळे आयुष्य स्थिर व्हायला लागले. दोन पैसे हाती आल्यावर छोटे हॉटेल सुरु केले. धंदा चालायला लागल्यावर भाड्याने दुकान घेतले, धंदा वाढवला. यामुळे आयुष्य स्थिरावले, संपन्नता आली. त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे गाव, परिवार, नाते गोते डोकस्यातून काढून टाकले. सकाळी सहा वाजेपासून ढोर मेहनत करायची, तीन माणसाचे काम स्वतः करायचे हा नित्यक्रम होता. पाहतापाहता बडोदा परिसरात २० वर्षे निघून गेली.
विठू माऊलीची कृपा की मातेची ओढ?
नुकत्याच संपलेल्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जायची इच्छा झाली. यामुळे ट्रॅव्हल्सने ते पंढरपूरला पोहोचले. प्रवासा दरम्यान प्रकृती बिघडल्याने एका नातेवाईकांकडे जाणे अपरिहार्य ठरले. त्यांच्या घरी गेल्यावर त्याने गावी जाण्याची गळ घातली. घरची मंडळी, बायको, मुलं वाट पाहताहेत. डोळे मिटण्यापूर्वी एकदा तुम्हाला पाहायची आईची इच्छा आहे , अशी विनवणी करून सांगितले. यामुळे मोरखडे गावी जाण्यास तयार झाले.
बँड अन पेढे…
घरचे आणि गावकऱ्यांनी अपेक्षा सोडून दिली असताना ते नावाप्रमाणेच ‘अवचित’ पणे आपल्या मूळ गावी आले. नातेवाईक व गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. बँड बाजा वाजवीत त्यांना घरापर्यंत आणण्यात आले. एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड करण्यात आले. गळ्यात जंगी हार टाकून सर्व त्यांच्या पाया पडले. यामुळे गावात सणा सारखा जल्लोष साजरा करण्यात आला. आज गावात दाखल झाल्यावर त्यांनी स्थानिक माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना आपला संघर्ष उलगडून सांगितला.