बुलढाणा: बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जन गंभीर जखमी झाले आहे.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. यानुसार मारूती (ईको) कंपनीची (एमएच ३७ एएच ३०९९ क्रमाकांची) कर बुलढाण्यावरून मोताळ्याच्या दिशेने जातं होती . मोहेगाव ( तालुका मोताळा ) येथील रतीलाल राठोड हे बुलढाण्याकडे काही कामानिमित्त येत होते.
दरम्यान आज बुधवारी, १८ जून रोजी राजूर घाटातील संकट मोचन हनुमान मंदीराजवळ मारूती ईको आणि दुचाकी यामध्ये समोरासमोर भरवेगात धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये मारूती ईको गाडी खाली दुचाकी अडकली . अपघातात रतीलाल राठोड (राहणार मोहेगाव) यांचा मृत्यू झाला. तसेच मारूती ईको कार मधील शिव प्रसाद, निकिता प्रसाद बुलढाणा हे जखमी झाले आहे. यामुळे राजूर घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस राजूर घाटातील अपघात स्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थाळावर बुलढाणा शहर पोलिस पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.