बुलढाणा : सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थान परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अखेर आज स्थगित केले. राज्य सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ११ सप्टेंबर रोजी बैठक ठेवल्याने आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे तुपकरांनी आंदोलन मागे घेतले.

चार दिवसांपासून सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू होते. आज चौथ्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी तुपकर यांची प्रकृती प्रचंड खालावली. त्यांची शर्करा पातळी कमी झाल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, आज सायंकाळी उशिरा सरकारचा निरोप घेऊन जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तुपकर यांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल झाले.

हेही वाचा – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?

…तर १२ सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन

जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र तुपकर यांना देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तुपकर व शिष्टमंडळासोबत शासकीय बैठक लावण्याचा शब्द देण्यात आला आहे. ११ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यामुळे तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘सरकारने चर्चेला बोलावले आहे. सरकार आपल्यासोबत काय चर्चा करते, बैठकीत काय निर्णय होतो, याची वाट पाहू. सरकारने बैठकीत आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मात्र १२ सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला.

भाऊ तुमची गरज…

त्याआधी राज्य सरकारच्यावतीने तुपकर यांना संध्याकाळी सात वाजताच्या आसपास बैठकीचा निरोप आला. मात्र, निर्णय घेण्यापूर्वी तुपकर यांनी सहकारी आणि उपस्थित शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. सरकारचा आलेला निरोप तुपकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितला. ‘आता आंदोलनाची पुढची दिशा काय, हे तुम्हीच ठरवा,’ असे तुपकर शेतकऱ्यांना म्हणाले. त्यावर प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. ‘भाऊ तुमची शेतकऱ्यांना गरज आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन स्थगित करा,’ अशी विनंती सर्वच शेतकऱ्यांनी केली. जे सरकार चर्चा करायला तयार नव्हते, त्या सरकारने चर्चेचे निमंत्रण देणे हे आपल्या आंदोलनाचे यश आहे, असा सूर यावेळी शेतकऱ्यांच्या भाषणातून उमटला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीचा मान ठेवत तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा – नागपूर : ठाकरे सेनेचे विचार अमान्य, पण मशिदी वाचवण्यासाठी…..एआयएमआयएमच्या नेत्याकडून थेट प्रस्ताव…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी तुपकर यांनी सोयाबीन, कपाशीला उत्पादन खर्चावर आधारित भाव, मागील वर्षीच्या खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम सरसकट देण्यात यावी, नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईची मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, शेतीला काँक्रीट किंवा तारेचे कुंपण बांधून द्यावे, आदी विविध मागण्यांसाठी सिंदखेडराजा येथील लखुजी राजे राजवाडासमोर ४ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. ६ सप्टेंबर रोजी कृषिमंत्र्याशी फोनवर केलेल्या चर्चेनंतरही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते.