नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन
शहरात पूर्वी विधि संस्थांच्या माध्यमातून संगीत समारोहाचे आयोजन केले जात असताना त्याचा आनंद घेण्यासाठी रसिकांची गर्दी असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत चांगली दर्जेदार नाटके आणि संगीताचे कार्यक्रम होत आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने शहरातील संगीत महोत्सवाच्या परंपरेला जपले असून शहरातील व्यावसायिकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भातील ज्येठ संगीततज्ज्ञांची निवड करीत त्यांना पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करून केंद्राच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षी समारोहाला २५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय कलावंतांसोबत जर्मनीमधील आंतरराष्ट्रीय कलावंतांनी हजेरी लावून रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्य न्या. भूषण गवई , उद्योजक विलास काळे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आप्पासाहेब इंदूरकर, तबलावादक गोपाळराव वाडेगावकर आणि शास्त्रीय गायिका उषा पारखी या तीन वैदर्भीय ज्येष्ठ कलावंतांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नागपूर सांस्कृतिक वैभव वाढविण्यासोबतच आणि पर्यटनदृष्टय़ा या शहराचा विकास करण्यासाठी नागपूरच्या तेलंगखेडी उद्यानात म्युझिकल फाऊंटेनची निर्मिती केली जाणार असून त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांचा सहभाग राहील. हा फाऊंटेन ए. आर रहेमान यांच्या संगीतावर, गुलजार यांच्या निवेदनावर आणि दक्षिणात्य अभिनेत्री रेवती हिच्या नृत्यावर आधारित आहे. शिवाय आर्ट गॅलरीची निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जर्मनीच्या रुद्रवीणा वादक कार्टसन विके यांचे रुद्रवीमावादन झाले. त्यांनी प्रारंभी राम मारवा सादर करून रसिकांची वाहवा मि़ळविली. अतिशय प्राचीन असलेल्या या वाद्याचा आस्वाद बऱ्याच कालावधीनंतर रसिकांना ऐकायला मिळाला. यांना पखावज संगत अखिलेश गुंदेजा यांनी केली. त्यानंतर पं. व्यकंटेश कुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना गुरुप्रसाद हेगडे, श्रीधर मांडे यांनी संवादिनी आणि तबला संगत केली.
विनोद वखरे आणि आनंद फडणवीस यांनी तानपुरा संगत केली. व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एन. सुब्रमणीयम यांच्या व्हायोलिनवादनाने पहिल्या दिवसाचा सोहळा आटोपला. यावेळी केंद्राचे प्रमुख पीयूष कुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business to take initiative for music festival say nitin gadkari
First published on: 31-07-2016 at 02:25 IST