scorecardresearch

भाजप, संघ परिवारातील संघटनांकडून ‘सी20’ परिषद वेठीस!, शासकीय यंत्रणा डावलून म्हाळगी प्रबोधिनीला काम

वैज्ञानिक दृष्टिकोन दुर्लक्षून अध्यात्मावर भर

'C20' conference by organizations in BJP, Sangh Parivar
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : जी-२० परिषदेंतर्गत नागपुरात सुरू असलेल्या सी-२० परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटना आणि भाजपने वेठीस धरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून आयोजित या परिषदेचा उपयोग आपल्या विचारसरणीच्या प्रचारासाठी केल्याचा आक्षेप शहरातील जागरूक नागरिकांनी नोंदवला आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपशी संबंधित असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला या परिषदेच्या आयोजनाचे काम दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार खर्च उचलत असल्याने आयोजनाची धुरा शासकीय यंत्रणेकडे असणे अपेक्षित होते. परंतु कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे सोपवण्यात आले. त्यांनी आपल्या विचारसरणी प्रमाणे प्रमुख अतिथी निश्चित केल्याची टीका आता होत आहे. जागतिक दर्जाच्या या परिषदेत वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य न देता अध्यात्मावर भर देण्यात आला. एवढेच नव्हे तर परदेशी पाहुण्यांचे स्वागत भारतीय परंपरेच्या नावाखाली मंत्रोपचाराने करण्यात आले. त्यासाठी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे विद्यार्थी बोलावण्यात आले.

हेही वाचा >>> खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!

आमदाराच्या पत्नीकडे माध्यम व्यवस्थापन

भाजपच्या कार्यकर्त्यांचा वावर संपूर्ण कार्यक्रमात होता. भाजपचे कार्यकर्ते सी-२० साठी आलेल्या २७ देशातील सुमारे ३५० प्रतिनिधींच्या अवती-भवती पिंगा घालत होते. परदेशी पाहुणे परिषदेत केव्हा बोलणार, कुठे जाणार, कुठे राहणार, शहरात काय-काय बघणार आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था कशी असणार याची इत्यंभूत माहिती त्यांनाच होती. हॉटेलमध्ये जागा कमी असल्याचे सांगून प्रसिद्धी माध्यमांना परिषदेचे थेट वृत्तांकन करण्याची संधी नाकारली गेली. त्यामुळे माध्यमांनी आयोजक जे सांगतील, त्यावर विश्वास ठेवून वृत्तांकन केले.

फक्त उद्घाटनीय कार्यक्रमाची लिंक देण्यात आली होती. विशेष म्हणजे, माध्यम व्यवस्थापन भाजपच्या विधान परिषदेतील एका आमदाराच्या पत्नीकडे देण्यात आले होते. या आमदार पत्नीचा माध्यम व्यवस्थापनाशी संबंध काय, त्यांच्याकडे हे काम कोणत्या निकषाच्या आधारे दिले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या परिषदेवर शासनाने सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च केला आणि भाजपने त्यातून आपला अजेंडा राबवला. भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बोलावून-बोलावून काम देण्यात आले. – संदेश सिंगलकर, सचिव, प्रदेश काँग्रेस.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 09:29 IST

संबंधित बातम्या