गडचिरोली : राज्य सरकारने नुकताच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली. याच धर्तीवर आता खासगी बसमध्ये सुध्दा महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनकडून घेण्यात आला आहे. आज, गुडीपाडवापासून नवे तिकीट दर लागू होणार असल्याची माहिती असोसिशनकडून देण्यात आली.

 राज्य परिवहन महामंडळच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याची घोषणा करताच राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. घोषणेच्या दिवसापासूनच हा निर्णय अमलात देखील आणला गेला. त्यामुळे एसटी बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनामध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती.

हेही वाचा >>> जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत संप संपवणार नाही, गोंदियात संप सुरूच

यावर उपाय म्हणून गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत या गडचिरोली चंद्रपूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल असा विश्वास संघटनेचे सदस्य राजू कावळे यांनी व्यक्त केला आहे.