नागपूर : देशात लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेल्या माजी मंत्री सुनील केदार यांचाही समावेश आहे. येणारी विधानसभा निवडणूक लढविता यावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या या याचिकेवर या आठवड्यात गुरुवारी २० जून रोजी सुनावणी होणार आहे. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्याने २२ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. सर्वच आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. सुरुवातीला केदारांनी सत्र न्यायालयात शिक्षेच्या स्थगितीसाठी व जामिनासाठी अर्ज केला होता. तो सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्या. उर्मिला जोशी-फाळके यांच्यासमक्ष सुनावणी झाली होती. अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी केदार यांची बाजू मांडली होती, तर अ‍ॅड. देवेंद्र चौहान यांनी त्यांना सहकार्य केले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. त्यानंतर सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीनंतर आता केदार यांनी शिक्षेच्या स्थगितीसाठी अर्ज केला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली आहे. इतकेच नव्हे तर नियमानुसार त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. मात्र, आता त्यांनी शिक्षेच्या स्थगितीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांना आमदारकी परत मिळेल. तसेच ते आगामी निवडणूकही लढू शकतील.

हेही वाचा – VIDEO : पाण्यात उतरण्यासाठी वाघिणीला करावी लागली कसरत, शेवटी…

हेही वाचा – मुख्य सचिवांच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली, उच्च न्यायालय म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाचीही जय्यत तयारी

नागपूर ग्रामीण भागात सुनील केदार यांचा राजकीय प्रभाव खूप आहे. याची प्रचिती अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाली. रामटेक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव करत कॉंग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी विजय प्राप्त केला. या विजयात सुनील केदार यांचेही मोठे योगदान होते. त्यामुळे सुनील केदार यांच्या राजकीय प्रभावाचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून राज्य शासनानेही त्यांना निवडणूक लढविता येऊ नये यासाठी जोरदार तयारी केली आहे. या तयारीचाच भाग म्हणजे, याप्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात येत आहे.