कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नाहीच, असा पवित्रा भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी घेतला आहे. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी चर्चा हा एकमेव पर्याय असून ती कुठल्याही अटीविना होणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पत्रकार भवनात बासित यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. दाऊदाच्या हस्तांतरणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी जो व्यक्ती पाकिस्तानमध्येच नाही त्याच्या हस्तांतरणाबाबत प्रश्नच उपस्थित होत नाही, असे विधान केले. पाकमधील अण्वस्त्राचे जनक अब्दुल कादीर खान यांनी अलीकडेच भारताबाबत केलेल्या वक्तव्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगितले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सुधारण्यासाठी दोन्ही देशातील चर्चेवर अधिक भर दिला. भारताच्या परराष्ट्रीयमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यानंतर दोन्ही देशातील आपसी चर्चेला पुन्हा सुरुवात होईल, अशी आशा निर्माण झाली. मात्र, त्यानंतर झालेल्या पठाणकोट हल्ल्यामुळे ती धुळीस मिळाली. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशातील चर्चा बंद आहे. चर्चेला विलंब होणे, ही बाब दोन्ही देशांसाठी हानीकारकच आहे. शांती हवी असेल तर चर्चेशिवाय पर्याय नाही. चर्चेचे फलित काय निघेल, याची अपेक्षा न करता ती सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे चर्चा ही विनाअट असावी, जेव्हा जेव्हा अटी टाकून चर्चा करण्यात आल्या तेव्हा तेव्हा त्या निष्फळच ठरल्या, याकडे बासित यांनी लक्ष वेधले. दोन्ही देशांपुढे दहशतवाद्यांच्या कारवायांसह अनेक आव्हाने आहेत. दशहतवादाची सर्वाधिक झळ पाकिस्तानलाच पोहोचली आहे. त्यामुळे हा देश त्यांना प्रोत्साहन देतो, असा आरोप करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतासोबत चांगले संबंध निर्माण व्हावे, असे तेथील जनता व राजकीय पक्षांनाही वाटते. मात्र, काही लोकांची विविध मुद्यांवर वेगवेगळी मते आहेत. ही बाब दोन्ही देशात आहे, याक डे दुर्लक्ष करणे हाच पर्याय आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुतांश कायदे सारखेच आहेत. पाकिस्तानात अनेक प्रकरणात भारताकडून काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पठाणकोट हल्ल्याची चौकशी सुरू असल्याने याबाबत अधिक बोलणे चुकीचे आहे. यामागचा सूत्रधार कोण, हे शोधणे हा दोन्ही देशाचा उद्देश असावा, असे ते म्हणाले.