लोकसत्ता टीम

यवतमाळ: भरधाव कारने रस्त्यावर उभ्या ऑटोला दिलेल्या धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आर्णी मार्गावरील जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचा शोध घेऊन आज, मंगळवारी दुपारी दत्त चौक ते आठवडी बाजार मार्गावर पेटवून दिली. आगीत कार जळून खाक झाली.

जय सुनील काठोडे (२३, रा. रोहिणी सोसायटी, जांब रोड), असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे. अपघातप्रकरणी रवी रामेश्वर मडावी (३१, रा. रामकृष्णनगर, मुलकी) याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जय व रवी पहाटे जुन्या बसस्थानक चौकातील वाहतूक थांब्यावर ट्रॅव्हल्स येण्याची वेळ झाल्याने ऑटो घेवून गेले. रवीने जय याला जिल्हा परिषदेसमोर लघुशंकेसाठी ऑटो थांबवण्यास सांगितले. याचदरम्यान नवीन बसस्थानकाकडून भरधाव वेगात व निष्काळजीपणे आलेल्या कारने (क्र. एमएच २९, बीपी ०९९९) ऑटोला धडक दिली. यात जय गंभीर जखमी झाला.

अपघात होताच कारचालकाने घटनस्थळावरून पळ काढला. जखमीला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करताच मृत घोषित केले. या घटनेमुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले. जयचे मित्र, नातेवाईकांनी आज या कारचा शोध घेऊन पेटवून दिली. यात कार जळून खाक झाली. अवधूतवाडी पोलिसांनी कारच्या चालकाविरुद्घ गुन्हा नोंदविला.