नागपूर: माफ करा आई बाबा नाही झेपणार मला… दीड आठवड्यांपासून वाटत होते, मी नाही करू शकणार… सॉरी…आणि धन्यवाद मला प्रत्येक गोष्ट वेळेत दिल्याबद्दल… माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आई- बाबा… पण बस्स… आता नाही होणार माझ्याकडून… बाय…

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या भावना आहेत, पंख्याला दोर लावत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलेल्या एका निरागस मुलाच्या… ख्वाहिश देवराम नागरे (वय १६) असे या पौगंडावस्थेतील मुलाचे नाव.

धड मिसुरडेही न फुटलेल्या या मुलाने हृदयात जपलेल्या लाखो ‘ख्वाहिश’वर पाणी फिरवत मृत्यूला करकचून मिठी मारत असताना अपेक्षांचे ओझे लादणाऱ्या लाखो पालकांना खडबडून जागे केले आहे. ख्वाहिश हा कॅनल रोडवरील फिजिक्सवाला विद्यापीठ या खासगी ट्यूशन क्लासेसचा विद्यार्थी होता.

मृत्य़ूला मिठी मारण्याच्या अगदी काही सेकंदापूर्वी ख्वाहिशने मित्रांसोबत खालच्या माळ्यावरील मेसमध्ये जेवण केले होते. सकाळी ११ च्या दरम्यान तो खोलीत शिरला तो कायमचा… त्याच्या अगदी काही क्षणापूर्वी आई- बाबांच्या नावे ख्वाहिशने एक चिठ्ठी पलंगावर लिहून ठेवली. त्यातला मजकूर खडबडून जागे करणारा आहे. या चिठ्ठीत ख्वाहिशने जे लिहिले त्यावर नुसती नजर फिरविली तरी मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा होती… पण नाही भेटू शकणार…माफ करा… तुम्ही रडू नका… मी जे करतोय ते स्वतःहून…

ख्वाहिश हा देखील पालकांच्या अशाच अवास्तव अपक्षांचे ओझे वाहणाऱ्या मुलांपैकीच एक होता. तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपलेले आपले लेकरू जीवघेणी स्पर्धा सहन करू शकेल का, त्याला हे झेपणार आहे का…याचा विचार पालकांनी पुन्हा एकदा करणे गरजेचे झाले आहे.

हुंदके, उसासे आणि डोळ्यांना धारा…

मृत्यूला मिठी मारण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी ख्वाहिशने खोलीतल्या अन्य मित्रांसोबत खाणावळीत जेवण केले. अन्य मुले खाली जेवत असताना कोणाच्याही ध्यानी मनी नसताना ख्वाहिश खोलीत गेला आणि त्याने दरवाजाला आतून कडी घातली. बराच वेळ तो खोलीचे दार उघडत नसल्याने मुलांनी लाथ मारून दरवाजा तोडला आणि समोरचे दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दुपारपर्यंत अख्ख्या वसतीगृहात हुंदके आणि उसासेच कानी पडत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाटेवरचा फोन, टेबलवरचे घड्याळ अनाम हुंदक्यांचे मुक साक्षीदार …

ज्या क्षणी ख्वाहिशने मृत्यूला कवटाळले त्या क्षणी त्याच्या खाटेवरचा फोन… शेजारी पडलेली वही… उशाला ठेवलेली बॅग आणि अभ्यासाच्या टेबलवरचे गजर करणारे घड्याळ ख्वाहिशच्या अनाम हुंदक्यांचे मुक साक्षीदार बनले.