चंद्रपूर : सावली तालुक्यातील पालेबारसा येथे घरात जेवण करीत असतानाच अचानक बिबट्याने प्रवेश करून हल्ला चढविला. या घटनेत ४ जण जखमी झाले. विशेष म्हणजे, हल्ला करणाऱ्या बिबट्याला घरात कोंडून ठेवण्यात आले. घटनास्थळी पोलीस व वनविभागची टीम दाखल झाली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पावसामुळे यात व्यत्यय येत आहे.

सावली तालुक्यातील पालेबारसा या गावात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत व भयभित झाले आहेत. सावली वनपरिक्षेत्र विभागाने दोन दिवसांपूर्वीच पालेबारसा येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन सतर्क राहण्याची सूचना केली होती. शनिवारी दुपारच्या सुमारास माधव मेश्राम यांच्या घरात बिबट्याने अचानक प्रवेश करून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी बिबट्याने घरातील लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यावेळी कुटुंबीयांना वाचविण्यासाठी गेलेले नेताजी कावळे व त्यांचा मुलगा लेश कावळे, विजय ठाकरे व अन्य एकाला बिबट्याने जखमी केले.

हेही वाचा – वर्धा : तिहेरी प्रेम प्रकरणातील तरुणीचाही अखेर मृत्यू, प्रेयसीच्या खोलीवर तरुणाला बघताच राग अनावर झाला आणि…

हेही वाचा – चंद्रपूर : जिल्हाधिकारी, सीईओंची भरपावसात धानशेतात रोवणी, पदाचा अभिनिवेश न बाळगता थेट चिखलात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याचा घरात धुमाकूळ सुरू असतानाच प्रसंगावधान साधून जखमींनी घरात शिरलेल्या बिबट्याला घरातच डांबून ठेवले. त्यानंतर या घटनेची ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी पाथरी पोलीस व पाथरी उपवनक्षेत्रच्या वन कर्मचारी यांना माहिती दिली. सध्या घटनास्थळी पोलीस व वनविभागची चमू आहे. मात्र पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. वनविभागची चमू ही बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्याच्या तयारीत आहे. मात्र बिबट्या काही केल्या पिंजऱ्यात येत नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घराभाेवती जाळी लावली आहे. वृत्त लिहेपर्यंत तिथे कारवाई सुरू होती. घटनास्थळी सध्या वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे, वनाधिकारी पवनरकर, गोडसेलवार, धनविजय, आदे, चुदरी यांच्यासह अनेक कर्मचारी बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न करित आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून बिबट गावालगत फिरताना अनेक ग्रामस्थांना दिसत आहे. या गावात रात्रीबेरात्री वन्यप्राणी येत असल्याने येथे कडक बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर्षी प्रथमच पावसाळ्यात धान रोवणीच्या काळात बिबट व वाघ सातत्याने धुमाकूळ घालत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कॅमेरा ट्रॅप देखील लावण्यात आले आहेत. बिबट्याने चार जणांना जखमी केल्याने दहशतीचे वातावरण आहे.