चंद्रपूर:संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. बँकेची अंतीम मतदार यादी गुरूवार २२ मे रोजी प्रसिध्द होणार आहे. या मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेत प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादीवरून मागील काही दिवसांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर १६ मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार होती. मात्र प्रकरण न्यायालयात गेल्याने प्रारूप मतदार यादीला स्थगिती दिली होती.
मात्र न्यायालयानेच यावर अंतिम निर्णय देत स्थगिती उठविली. त्यानंतर पून्हा बँकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान आता बँकेची अंतिम मतदार यादी गुरूवार २२ मे रोजी प्रसिध्द होणार आहे. ही प्रसिध्द होणारी यादी बँकेच्या कार्यालयात लावली जाणार आहे. या अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम यादी प्रसिध्द होताच बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. विशेष म्हणजे २०१२ पासून बँकेत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे.
आज तेरा वर्ष या संचालक मंडळाला झाली आहे. तेरा वर्षानंतर बँकेची निवडणुक होणार असल्याने सर्वांमध्येच उत्साह संचारला आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय जिल्ह्यातील सारेच लोकप्रतिनिधी इच्छुक आहेत. बँकेची तात्पुरती मतदार यादी पाहिली असता खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवर, आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्की दावेदारी दाखल केलेली आहे.
तसेच माजी संचालक सुभाष रघताटे, संजय डोंगरे, सुदर्शन निमकर,ऍड खेळकर, वसंत विधाते, जी.के.उपरे ,रामनाथ कालसर्पे यांची पुन्हा निवडणूक लढवायची तयारी, संभाव्य उमेदवारीसाठी दावेदारी दिनेश चोखारे, सतीश वारजूरकर, प्रकाश देवतले, सुरेश महाकुलकर, प्रशांत चिटणुरवार, आशुतोष चटप, अमर बोधलावार, जयंत टेमुर्डे, रामभाऊ टोंगे, रवींद्र मारपल्लीवर,चंद्रकांत गुरु, विलास विखार, श्यामकांत थेरे यांनी निवडणुकीची तयारी चालविली आहे.