चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत मेंडकी गावालगतच्या जबराबोडी मेंढाच्या जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात भास्कर गोविंदा गजभिये (६२) शेतकरी ठार झाला. या घटनेमुळे गावात प्रचंड दहशत व भीतीचे वातावरण आहे. मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. ही थरारक घटना सोमवार १० ऑक्टोबरच्या सकाळी उघकीस आली.

मेंडकी येथील रहिवासी असलेले भास्कर गजभिये हा शेतकरी रविवारी सायंकाळच्या सुमारास शेतात सिंदी तोडायसाठी गेले होते. धानाची शेती असल्याने धानाचे भारे बांधण्यासाठी सिंधीची गरज असल्याने एकटेच सिंधी तोडायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाही त्यामुळे सोमवारी सकाळी शोध घेतला असता सायकल व सिंधी रस्त्याच्या काढाला पडलेली दिसली. तसेच शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले दिसून आले. मृतकाच्या शरीराचे अवयव एकत्र गोळा केले. ब्रम्हपुरी वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. विशेष म्हणजे गजभिये यांच्या पत्नीचे निधन दोन वर्षापूर्वी झाले तर एक वर्षापूर्वी मुलगा दगावला होता. त्यामुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान वाघाला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.