चंद्रपूर: मालमत्ता कराची ३५ कोटींपेक्षा अधिकची रक्कम थकीत असल्याने महापालिकेने जप्ती मोहिम तीव्र केली आहे. आतापर्यंत १ हजार पेक्षा अधिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात ही मोहिम अधिक तीव्र केली जाणार आहे. महापालिकेतर्फे ३१ मार्चपुर्वी अधिकाधिक मालमता कर वसुलीचे ध्येय समोर ठेऊन नियोजन केले.

मनपाची पथके थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुली करीत आहेत. ३१ मार्चपर्यंत शास्तीवर २५ टक्के सूट देण्यात आली असुन तरीही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील व जप्त केल्या जात आहेत. नुकतेच एमईएल प्रभागातील तुकडोजी महाराज सेवा समिती इथे १३ गाळे सील केले आहे . प्रत्येक झोनमध्ये ५ याप्रमाणे १५ व मार्केट वसुलीसाठी २ याप्रमाणे १७ पथकांवर वसुलीची जबाबदारी असुन आतापर्यंत ५६.३३% टक्के वसुली करण्यात आली आहे.

मालमत्ता कराची थकीत व चालु मागणी मिळुन एकूण ८० कोटी ५८ लक्ष रुपयांची मागणी आहे. त्यातील थकीत व चालु मिळुन ४५ कोटी ७०लक्ष रुपयांची वसुली झाली आहे. तर ३५ कोटींपेक्षा अधिकचा कर अद्यापही थकीत आहे. तिन्ही झोनमधील अनेक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असुन कर भरणा न करणाऱ्या १ हजारांवर मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थकबाकीचा भरणा न केल्यास जप्ती केलेल्या मालमत्तांवर १५ दिवसांच्या आत कारवाई करण्याचा अधिकार मनपाला असल्यांने पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे .यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. यापूर्वी नियमित व आगाऊ कर भरणा करणाऱ्यांना चालु वर्षाच्या मागणीत १० टक्के सूट देण्यात आली होती तसेच थकबाकीदारांना १५ फेब्रुवारी पर्यंत ५० टक्के शास्तीत सवलत देण्यात आली होती. ऑनलाईन २५ टक्के व ऑफलाईन २२ टक्के शास्तीत सूट ही ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.