चंद्रपूर : महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत मागील तीन वर्षांत शालेय बाके (डेक्स-बेंच) खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अभिजीत खापणे या एकाच कंत्राटदाराला सलग तीन वर्षे बाके खरेदीचे कंत्राट कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित करीत ‘आप’ने या खरेदीत किमान ५८ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये १२० बाके खरेदी करण्यात आली. यासाठी ९ लाख ९७ हजार ५२०० रुपये खर्च झाले. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४०० बाके खरेदीची निविदा काढण्यात आली. ४४ लाख ८० हजार ८० रुपयांचे हे कंत्राटही खापणे यांनाच मिळाले. तसेच यावर्षी म्हणजेच २०२५-२६ मध्ये ४०० बाके खरेदीसाठी निविदा काढण्यात आली. योगायोगाने यावर्षीही खापणे यांनाच ४४ लाख ८८ हजार रुपयांचे हे कंत्राट मिळाले. सलग तीनही वर्षी एकाच कंत्राटदाराला हे कंत्राट मिळाल्याने ही निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचे स्पष्ट होते. महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची या कंत्राटदारावर ‘कृपादृष्टी’ असल्यानेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेचे स्पष्ट उल्लंघन करण्यात आले. प्रत्येक निविदेत केवळ तीनच निविदाधारकांचा सहभाग होता. या माध्यमातून निविदा प्रक्रियेत कृत्रिम स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
दुप्पट दराने खरेदी
निविदेत अकारण दरवाढ करण्यात आली. २०२२-२३ नंतर प्रत्येक बाकांच्या दरात सुमारे तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली. ‘जीईएम पोर्टल’वर समान दर्जाचे बाके ४ हजार ५०० रुपयांत उपलब्ध असतानाही दुप्पट दराने खरेदी केली गेली. अनिवार्य बाजार दर सर्वेक्षण व तुलना, यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. केंद्र सरकारच्या पारदर्शक खरेदी धोरणाचे हे उघड उल्लंघन आहे. याद्वारे सार्वजनिक निधीचा अपव्यय व अकारण खर्च करण्यात आला. यातून महापालिकेचे किमान ५८ लाखांचे आर्थिक नुकसान झाले, असे ‘आप’ने म्हटले आहे.
चंद्रपूर महापालिकेत प्रशासक व नगर सचिव विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक निधीचा अपहार करण्यात आला. शालेय मुलांच्या हक्काचा पैसा लुटल्या गेला. जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संपूर्ण नुकसान वसूल करण्यात यावे. या तिन्ही निविदा प्रक्रियेतील निविदाधारक कंपन्यांची व त्यांच्या परस्पर संगनमताची सखोल चौकशी करावी. – मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आप.