चंद्रपूर : आमदाराच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री घडली. किशोर प्रेमदास पाटील (४८), असे मृताचे नाव आहे, तर जितेंद्र कुमार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्यासाठी किशोर प्रेमदास पाटील, जितेंद्र कुमार आणि इंद्रजित सोनवणे हे तिघे प्रभाग क्रमांक ४ येथील सुचक यांच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गेले होते. ते शुभेच्छा फलक एका दोरीच्या साहाय्याने खेचत होते. इतर काही जण खाली उभे होते. शुभेच्छा फलक इमारतीच्या वरच्या माळ्यावर आल्यानंतर किशोर पाटील, जितेंद्र कुमार आणि इंद्रजीत सोनवणे यांनी ते पकडले.

इमारतीला लागूनच महावितरणाची वीज तार गेली आहे. अशातच फलकाचा जिवंत वीज ताराला स्पर्श झाल्याने किशोर पाटील आणि जितेंद्र कुमार यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ते खाली कोसळले. हे पाहून इंद्रजित सोनवणे यांनी तत्काळ फलक सोडून दिले. खाली कोसळलेल्या दोघांना काय झाले, याची विचारणा केली. जितेंद्र कुमार यांनी प्रतिसाद दिला. मात्र, किशोर पाटील यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. इंद्रजित सोनवणे यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. जखमी सहकाऱ्यांना जवळच असलेल्या बोरकर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान किशोर पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा परसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज पडून दोघांचा मृत्यू

सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पाऊस सुरू असतानाच वीज पडून संगीता सचिन चौधरी (३५) या महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे नागभीड तालुक्यातील जीवनापूर टोला या गावात गणेश पांडूरंग वाळके (२८) यांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी शेतीची कामे करीत होते. त्याच सुमारास ही दुर्देवी घटना घडली. नागरिकांनी वीजेपासूर स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.