चंद्रपूर : चंद्रपूरवासीयानी शनिवार १३ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचा रौद्र अवतार बघितला. अवघे २० ते २५ मिनिट विजांच्या प्रचंड कर्णकर्कश आवाजासह जणुकाही आभाळ फाटले असे अशा स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे शनिवारी संपूर्ण चंद्रपूरकरानची झोप मात्र उडाली होती. चंद्रपुरात झालेला आताचा पाऊस म्हणजे ‘कहरच होता,मेघगर्जना, विजाचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि धो धो पाऊस असा पाऊस आजवर बघितला नाही अशी प्रतिक्रिया आज अनेकांनी समाज माध्यमावर नोंदवली आहे.

पर्यावरण वन्यजीव अभ्यासक डॉ. योगेश दुधपचारे यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना शनिवारी रात्री आकाशात जणुकाही फटाके फुटले असे म्हटले आहे. जेव्हा पासून कळायला लागले तेव्हापासूनचा सर्वात खतरनाक पाऊस पाहण्याचा, अनुभवण्याचा अनुभव घेतला असे चंद्रपूरचे नागरिक भय्या पोटदुखे यांनी मत व्यक्त केले आहे. रात्री यावेळेस सुध्दा झोप विसरुन, अनेक परिवार घरात एके ठिकाणी एकत्र बसून असल्याचा अनुभव प्रथमच घेत आहे.

चिंता वाढविणारे ते २० मिनिट होते असेही ते म्हणाले. हा पाऊस म्हणजे नुसता कहरच होता अशी प्रतिक्रिया इको प्रो चे बंडू धोतरे यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे! मेघगर्जनेचा प्रचंड आवाज, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि धो धो कोसळणारा पाऊस… हा अनुभव मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घेतला. ज्या क्षणापासून मला समज आली, त्या क्षणापासूनचा हा सर्वात खतरनाक आणि थरारक पाऊस होता. रात्रीची वेळ होती, एरव्ही शांत होणारा आमचा पठाणपुरा विठ्ठल मंदिर परिसर शनिवारी निसर्गाच्या या अचानक बदललेल्या रूपामुळे पूर्णपणे जागे झालेला होता. (बहूतेक शहरात सर्वत्र) सगळेजण झोप विसरून आपापल्या घरात एका कोपऱ्यात एकत्र बसले होते.

सकाळपासूनच इरई धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू होताच, इकडे पठाणपुरा गेट बाहेर आणी विठोबा खिडकी बाहेर पाण्याच्या पातळीत वाढ असलेला एकखाद दूसरा सांगतच आहे आणि त्यातच अशा ढगफुटीसारख्या पावसाने परिस्थिती आणखीच भयावह बनली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच चिंता होती. ती २० मिनिटे तर अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारी होती. आम्ही सारे खिडकीतून बाहेर बघत होतो.

जेव्हा वीज चमकत होती, तेव्हा सारा परिसर एका क्षणात लख्ख प्रकाशात न्हाऊन निघत होता. त्या क्षणासाठी थोडं कुतूहल जरी वाटले, तरी दुसऱ्याच क्षणाला विजांचा कडकडाट आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी पुन्हा एकदा थरारक वातावरण निर्माण करत होत्या. जणू काही निसर्गाने आपलं रौद्ररूप दाखवलं होतं. तो अनुभव केवळ पावसाचा नव्हता, तर निसर्गाच्या शक्तीचा आणि त्यासमोर आपण किती लहान आहोत याची जाणीव करून देणारा होता.

तो क्षण भीतीदायक असला तरी, एकत्र येण्याची आणि संकटाचा सामना करण्याची एक वेगळीच शिकवण देऊन गेला. समाज कार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. जयश्री कापसे गावंडे यांनी असा विजांचा कडकडाट, निसर्गाचे रौद्र रूप प्रथमच बघितले असे सांगितले. एकीकडे निसर्गाचा हा रौद्र अवतार सुरू असताना शहरातील ८० टक्के भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्वच भागात झाडे कोसळली होती, विजांच्या तारा तुटून पडल्या होत्या. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. घरच्या खिडकी व दरवाजावर विजांच्या आवाजासह प्रकाश अंधाऱ्या रात्री भीतीदायक होता. एकूणच चंद्रपूरवासियानी असा विजांचा कडकडाट व पाऊस प्रथम बघितला आणि अनुभवला.