चंद्रपूर : मागील आठ वर्षांत शहराची लोकसंख्या व मतदारांची संख्या वाढल्यानंतरही महापालिका निवडणुकीसाठी २०१७ ची प्रारूप प्रभागरचना ‘जैसे थे’ ठेवण्यात आली. भाजपला पोषक असलेली प्रभागरचना कायम ठेवणे इतर पक्षांवर अन्याय असून त्यात बदल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आगामी निवडणुकीसाठी महापालिका प्रशासक व आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे २०१७ ची प्रारूप प्रभाग रचना ‘जैसे थे’ स्वरूपात पाठविली. २०२२ मध्ये प्रभाग रचना तयार केली होती. त्यावेळीही आक्षेप नोंदवण्यात आले होते. मात्र, वैद्य यांच्या मते, त्यावेळी महापालिकेने भाजपला अपेक्षित असलेली २०१७ ची प्रभाग रचना कायम ठेवली होती. आतादेखील तोच कित्ता गिरवण्यात आला.
यामध्ये सिव्हिल प्रभागाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. महापालिकेकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रभाग रचनेत बदल करावा, अशी मागणी केल्याचे वैद्य यांनी सांगितले. निवडणुक आयोगाने एक अधिकारी पाठवून प्रत्येक प्रभागाला भेट द्यावी आणि तेथील माहिती, नकाशा, लोकसंख्या व प्रत्यक्ष मतदारसंख्या जाणून घ्यावी, असे या पत्रात नमूद आहे.
प्रभागरचनेसंदर्भात महापालिकेकडे १५ सप्टेंबरपर्यंत आठ हरकती प्राप्त झाल्या. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या हरकतींवर सुनावणी होणार आहे. अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे.
अकोल्यातील प्रभागरचनेवर ४८ हरकती
अकोला : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर तब्बल ४८ हरकती घेण्यात आल्या आहेत.
प्रभाग दोनमधील समाविष्ट संत कबीर नगरचा काही भाग वगळल्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात आला. प्रभाग १३ मधील प्रभागरचनेवर एक हरकत दाखल करण्यात आली. रचनेमध्ये प्रभाग एक व दोनच्या पुनर्रचनेवर एक हरकत, प्रभाग सातच्या रचनेत बदल करण्यावर देखील एक हरकत दाखल केली. प्रभाग सहाच्या रचनेत बदल करण्यावरून वेगवेगळ्या चार हकरती, प्रभाग एकमधील दुर्गा नगर, नाना नगर या भागाला प्रारूप प्रभाग रचनामध्ये समाविष्ट केल्याबद्दल दोन आक्षेप घेण्यात आले. यासह शहराच्या विविध प्रभागातील एकूण ४८ हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.