भंडारा: प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. छंद हा जोपासलाच पाहिजे. पण तो कुठे याचेही तारतम्य पाळायला हवे. आपण एखाद्या जबाबदार पदावर असाल तर आधी जबाबदारी आणि नंतर छंदाची जोपासना केली जावी. पण एक डॉक्टर असे आहेत, ज्यांनी छंद जोपासताना वरील भान ठेवले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कुक्कुटपालन आणि अंडे उबवण्याच्याचे काम ते करतात.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. चंदू वंजारे यांचा हा प्रताप आहे. आरोग्य विभाग तर अत्यंत संवेदनशील आहे. जिथे रुग्ण बरे होण्यासाठी, तेथेच कोंबड बाजार मांडून घाणीचे साम्राज्य पसरवले जात आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात हे कुक्कुटपालन होते. कोंबड्यांचे खाद्य, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सर्वकाही डॉक्टर जातीने बघतात. एवढच काय तर अंडे उबवण्यासाठी त्यांनी लाईट लावून स्वतंत्र व्यवस्था केली आहे. येथील अंडे वरिष्ठ अधिकाऱ्यांही पुरवले जात असल्याचे सांगितले जाते.
डॉक्टरांचे कुटुंब असलेले या कोंबड्यांचा वावर रुग्णालयातील रुग्णांच्या खाटावर आणि रुग्णालय परिसरात होतो. ज्याचा त्रास रुग्णांना होत असेल पण साहेबांपूढे बोलणार कोण? कोंबड्याची विष्ठा आणि अन्य घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मग आता आरोग्य सुदृढ करण्यासाठी येणारे रुग्ण खरच बरे होऊन जात असतील का हा प्रश्न आहे.
कोंबड्या पाळणे डॉक्टरांचा छंद असल्याचे समजते. तो कुठे जोपासला पाहिजे हे याचेही भान डॉक्टर साहेबांनी ठेवायला हवे.रुग्णालयात सर्वत्र घाण, अस्वच्छता आणि साहेब कोंबड्या पाळण्यात व्यस्त हे चित्र जरा चिंतन करण्यास भाग पडणारे आहे. आता त्यांच्या वरिष्ठानीच सांगावे, डॉक्टरांचे हे वागणे बरे आहे का? त्यांना शासकीय वास्तूत हे सर्व करण्याची परवानगी आहे का?
दोन दिवसांपूर्वी लाखांदूर पंचायत समितीचे सभापती पुरुषोतम ठाकरे यांनी भेट दिली. हा सर्व प्रकार पाहून ते आवक झाले. प्रचंड नाराजी व्यक्त करीत त्यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली.
हा माझा छंद : डॉ. वंजारे
कोरोना काळापासून हा छंद मला लागला. मी निवासस्थानाच्या आवारात पाळतो. कोणतीही घाण, रुग्णच्या बेडवर वावर नसतो. हा प्रकार नाहक बदनामी करण्याचा आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी वंजारे यांनी दिली.
हा प्रकार अत्यंत चुकीचा: ब्राह्मणकर..
वैद्यकीय अधिकारी ही जबाबदार व्यक्ती आहे. छंद कुठे जोपासावे हे त्यांना कळले पाहिजे. हा प्रकार चुकीचा असून ताबडतोब कोंबडी बाजार काढला जावा आणि कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आणि रुग्णालय आरोग्य समिती अध्यक्ष डॉ. अविनाश ब्राम्हणकर यांनी केली आहे.
डॉक्टर वंजारे यांनी माझ्या बाबत केलेल्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नसून तालुका आरोग्य अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. आहेत त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – डॉ. मिलिंद सोमकुवर आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. भंडारा</strong>