नागपूर : भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एका नव्या पर्वाची नोंद झाली आहे. नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने ‘फिडे वर्ल्ड वुमेन्स चेस कप’च्या अंतिम फेरीत धडक मारत भारताची मान उंचावली.या अपूर्व यशासह ती ग्रँडमास्टर पदवी मिळवणारी देशातील सर्वात तरुण महिला ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर दिव्याच्या घरी एक अनपेक्षित पण अत्यंत गौरवाची भेट झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तिच्या नागपूरमधील शंकरनगर चौकातील घरी प्रत्यक्ष भेट दिली आणि तिचे विशेष कौतुक केले.

दिव्याच्या घरी झालेल्या या भेटीत सरन्यायाधीशांनी तिच्या मेहनतीचं, चिकाटीचं आणि समर्पणाचं भरभरून कौतुक केलं. “तू देशाला अभिमानाची आणि प्रेरणादायी भेट दिलीस. यामुळेच मी स्वतः इथे आलोय,” असं सांगत त्यांनी तिच्या कुटुंबीयांनाही अभिनंदन दिलं. या भेटीत दिव्याच्या आई-वडिलांनी तिच्या बालपणातील आठवणी, सुरुवातीचा बुद्धिबळप्रवास आणि आलेल्या अडचणी शेअर केल्या.

दिव्या देशमुखने वयाच्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. वयाच्या ९ व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. २०१३ मध्ये तिला वुमन फिडे मास्टरचा किताब मिळाला आणि त्यानंतर तिचा प्रवास केवळ प्रगतीचा राहिला. बटुमी, जॉर्जियामधील वर्ल्ड कप स्पर्धेत तिने दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आणि तिच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला.

सरन्यायाधीश गवई हे स्वतः विदर्भाचे असून त्यांनी याआधीही स्थानिक गुणवंतांचा सत्कार केला आहे. मात्र यंदा दिव्याच्या कामगिरीने ते स्वतः भारावून गेले. न्यायसंस्थेच्या सर्वोच्च स्थानावर बसलेली व्यक्ती एखाद्या खेळाडूच्या घरी जाऊन तिचं कौतुक करते, हे दृश्य फार दुर्मीळ आहे. गवईंच्या या भेटीमुळे ना केवळ दिव्या, तर तिच्यासारख्या अनेक तरुणींना मोठं बळ मिळालं आहे.

“तू लाखो मुलींसाठी रोल मॉडेल आहेस. बुद्धिबळाच्या पटावर तू ज्या थंडपणे चाल खेळतेस, तीच शिस्त आणि संयम प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे,” अशा शब्दांत गवईंनी दिव्याचं मनोबल वाढवलं.दिव्या देशमुख सध्या आगामी आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तयारी करत असून, तिच्याकडून देशाला आणखी पदकांची आशा आहे. तिच्या या प्रवासाला न्यायसंस्थेच्या सर्वोच्च प्रमुखांनी दिलेली मान्यता ही केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर नागपूर आणि भारतासाठीही अभिमानास्पद ठरली आहे.