अमरावती : आपण पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही, असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दर्यापूर तालुक्यातील दारापूर या त्यांच्या मूळगावी बोलताना हे वक्तव्य केले आहे. भूषण गवई पुढे म्हणाले की, ऑक्सफर्ड विद्यापीठासह विदेशात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्याची संधी मला मिळाली.

दारापूरचा सुपूत्र म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. माझ्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेम पाठीशी आहेच. मी ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही. जास्तीत जास्त वेळ मी दारापूर आणि अमरावती, नागपूर मध्ये घालवणार असेही सरन्यायाधीश म्हणाले.

रिपब्लिकन चळवळीतील नेते, माजी राज्‍यपाल दिवंगत रा.सू. उपाख्‍य दादासाहेब गवई यांच्या स्‍मृतीदिनानिमित्‍त दर्यापूर तालुक्‍यातील दारापूर येथे आयोजित कार्यक्रमात अनेकांनी गर्दी केली. विविध क्षेत्रातील मान्‍यवर स्‍मृतीस्‍थळी पोहचून दादासाहेब गवई यांना अभिवादन केले. भारताचे सरन्‍यायाधीश भूषण गवई हे दरवर्षी स्‍मृतीदिनी दारापूर येथे येत असतात. सरन्‍यायाधीश झाल्‍यानंतर प्रथमच दारापूर येथे त्‍यांचे आगमन झाले. ते दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. गावकऱ्यांसाठी हा भावूक क्षण होता. अनेकांनी दादासाहेब गवई यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. डॉ. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार बळवंत वानखडे, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती गवई अर्जून, तेजस्विनी गवई, संस्थेचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूरचे प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, धरम गवई आदी यावेळी उपस्थित होते. तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील इनडोअर स्टेडियममध्ये दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्धवदंना करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ. कमलाकर पायस यांनी तर आभार अधीक्षक सचिन पंडित यांनी मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादासाहेब गवई यांच्या आठवणी

कुठलाही राजकीय वारसा नसताना, पैसा नसताना, कुठल्याही भक्कम राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना तब्बल ३० वर्षे आमदारकी, १३ महिने लोकसभा, नंतर राज्यसभा, पुढे बिहार व केरळचे राज्यपाल. असे वैभव वाट्याला आल्यानंतर अत्यंत साधा, जमिनीवर असणारा नेता अशी रा. सू. गवई यांची ओळख होती.