चंद्रपूर : महापालिकेच्या रहमत नगर येथील इरई नदीच्या पात्रालगत असलेल्या सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये लागलेल्या क्लोरिन सिलेंडर मधून गॅस गळती सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान परिसरातील १५ ते २० लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. यातील काहीना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर तेथील ६० ते ७० कुटुंबांना महापालिका शाळेत स्थलांतरित केले आहे.

इरई नदीच्या काठावर महापालिकेचा सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. भूमिगत गटार मधून जाणारे अशुद्ध पाणी या ट्रीटमेंट प्लांट मधून शुद्ध करून त्याचा पुन्हा वापर केला जातो. या प्लांट मध्ये क्लोरिन सिलेंडर लावण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक या प्लांट मधून गॅस गळती सुरू झाली. या परिसरातील काही लोकांना श्वास घेण्यास त्रास सुरू होताच हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान ही घटना वाऱ्यासारखी या परिसरात पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला मिळताच प्रभारी आयुक्त गायकवाड, सहायक आयुक्त, शहर अभियंता रवी हजारे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी लोकांची धावपळ सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने सर्वांना तोंडावर मास्क लावण्याचे आवाहन केले. मात्र तोपर्यंत १५ ते २० लोकांना श्वास घेण्यास अधिक त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक आहे.

दरम्यान एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मास्क लावून गॅस गळती सुरू असलेल्या ठिकाणी प्रवेश केला. तसेच गॅस गळती कुठून सुरू आहे याचा शोध घेऊन तत्काळ उपाय योजना करण्यात आल्याने गॅस गळती सध्या बंद झाली अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तरीही परिसरातील काही लोकांना इतरत्र स्थलांतरित केले आहे. घटनास्थळी महापालिका आयुक्त गायकवाड आहेत. तिथे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक तथा अधिकारीवर्ग तैनात आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

फायर कंट्रोल रूम यांच्यामार्फत प्राप्त माहितीनुसार, शहरातील रहमत नगर भागातील चंद्रपूर शहर महापालिका यांचे पाणी शुद्धीकरण केंद्रावर क्लोरिन गॅस(CHLORINE GAS) लीक झालेला आहे. महापालिका यांची अग्निशमन यंत्रणा त्या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.कोणतीही जीवित हानी नाही.

६० ते ७० घरातील लोकांना किडवाई शाळेत तसेच इतर महानगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आलेले आहे परिस्थिती नियंत्रणात आहे. – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून मिळालेली माहिती