नागपूर : ‘सीएम’च्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट समोर आली असून चाहते काळजीत पडले आहेत. दरम्यान, उपचारासाठी टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी थेट राज्य शासनाला ई-मेल करून ‘सीएम’च्या प्रकृतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांत ‘सीएम’ ने सगळ्यांनाच लळा लावला आहे. आपल्या अधिकार क्षेत्रावर राज्य करण्याची त्याची पद्धत, आपल्या अधिकार क्षेत्रात कुणालाही प्रवेश करू न देण्याचा बाणा, इतरांनी ते अधिकार क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचवेळी त्याला त्याची जागा दाखवून देण्याची धाडसी पद्धत, चाहत्यांना सहज सामोरे जाण्याची सवय अशा एक ना अनेक बाबींमुळे ‘सीएम’ने अल्पावधीतच आपल्या सभोवताल गोतावळा निर्माण केला. मात्र, जसे चाहते असतात, तसेच शत्रूही असतात आणि अशा शत्रूंचा सामना करताना अनेकदा ‘सीएम’ च्या जीवावर देखील बेतले आहे. यावेळी प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून ‘सीएम’ च्या प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे चाहत्यांमध्ये चांगलाच रोष आहे. व्यवस्थापन ‘सीएम’ च्या मृत्यूची वाट बघत आहे का, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
हे ‘सीएम’ कोण..?
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील काही वाघांनी या व्याघ्रप्रकल्पाला ओळख दिली. ताडोबाच्या बफर क्षेत्रात पर्यटकांमध्ये ‘सीएम’ उर्फ ‘छोटा मटका’ नावाच्या या वाघाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. अगदी अलिझंझा ते निमढेला असा त्याचा मुक्त वावर असतो. प्रसिद्ध वाघीण ‘छोटी तारा’ आणि शक्तिशाली वाघ ‘मटकासुर’ यांचा तो वारसदार. ‘छोटा मटका’ या वाघाने “मोगली” आणि “बजरंग” या दोन वाघांसह इतर प्रभावी वाघांकडून आलेल्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्याने एका विशाल प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ‘छोटा मटका’ या नावाने प्रसिद्ध वाघाची अधिवासासाठी ‘ब्रम्हा’ या नावाने प्रसिद्ध वाघाशी लढाई झाली. या लढाईत ‘ब्रम्हा’चा मृत्यू झाला तर ‘छोटा मटका’ गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या पायाला मोठा चिरा पडून सातत्याने त्यातून रक्त वाहत होते. लढाई झाल्यानंतर रक्ताळलेल्या पायासह तो पर्यटकांना दिसला. पर्यटकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्याऐवजी निसर्गावर सोपवण्यात आले. “लोकसत्ता” च्या वृत्तानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे वाटत असतानाच आता त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे. छोटा मटका गुरे मारत उद्यानाच्या सीमेभोवती फिरत होता. त्याला पुन्हा मारताना दुखापत झाली. त्याच्या दुखापतीमुळे आणि कमी वेळात त्याला त्याचा बराचसा भाग गमवावा लागला आहे. तो मर्यादित क्षेत्रात फिरत आहे आणि इतर वाघांशी सामना टाळत आहे.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात पर्यटकांमध्ये 'सीएम' उर्फ 'छोटा मटका' नावाच्या या वाघाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. ‘ब्रम्हा’ या नावाने प्रसिद्ध वाघाशी झालेल्या लढाईत ‘छोटा मटका’ गंभीररित्या जखमी असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.
— LoksattaLive (@LoksattaLive) August 18, 2025
(व्हिडीओ – कांचन पेठकर)… pic.twitter.com/eJve9dJ7y1
आता त्याला चालणे तर दूरच पण एक जखमी पाय खाली ठेवणेसुद्धा कठीण जात आहे. हा पाय आता काळानीळा पडला आहे. एवढे होवूनही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या या वाघाच्या प्रकृतीकडे आणि त्याच्या उपचाराकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. तो नैसर्गिकरित्या ठीक होईल, वनविभाग त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे, असेच उत्तर ताडोबा व्यवस्थापनाकडून दिले जात आहे.