लोकसत्ता टीम
नागपूर : वाघांना माणसासारखं पोहता येतं नाही, पण पाण्यातून तो नक्कीच मार्गक्रमण करू शकतो. तासनतास पाण्यात एकाच ठिकाणी डुंबलेला वाघ आपण पाहिलाय, पण ताडोबातील “छोटी मधू” या वाघिणीचा पाण्यातून मार्गक्रमण करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. उन्हाच्या झळा असह्य झाल्यामुळे ती बराच वेळ पाण्यात बसली आणि पाण्यातून मार्गक्रमण करत जंगलाच्या दिशेने वळली. हा अतिशय दुर्मिळ क्षण टिपलाय वन्यजीवप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी.
वाघ शिकार करताना किंवा त्यांच्या अधिवासात आराम करताना दाखवणारे व्हिडीओ नेहमीच पाहिले जातात, पण वाघाला पाण्यात डुंबताना पाहणे तसे दुर्मिळच. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका वाघाला जेरबंद करून नंतर त्याला बोटीतून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या वाघाने पिंजऱ्याचे दार उघडताच बोटीतून थेट पाण्यात उडी मारली आणि पाण्यातून मार्ग काढत तो जंगलात निघून गेला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील आगरझरी बफर क्षेत्रातील “छोटी मधू” या वाघिणीने याच प्रसंगाची आठवण करून दिली.
उन्हाच्या झळा जिथे माणसांनाच सहन होत नाही, तिथे प्राण्यांना त्या कशा सहन होणार! मग या वाघिणीने थेट तलावाकडे धाव घेतली आणि पाण्यात मनसोक्त स्वच्छंद विहार केला. उन्हाचा दाह शांत झाल्यानंतर ती पाण्याबाहेर निघाली आणि जंगलाकडे धूम ठोकली. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी हे नेहमीच वाघांच्या वेगवेगळ्या अदा टिपत असतात आणि हा दुर्मिळ क्षण त्यांनी अलगदपणे कॅमेऱ्यात टिपला.