नागपूर : हवामान बदलामुळे मोठी मनुष्यहानी होत असून, देशात यंदाच्या नऊ महिन्यांत हवामान बदलामुळे तीन हजार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायर्नमेंट’च्या अहवालातून उघड झाली आहे.

देशात जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत बहुतांश दिवस अत्यंत तीव्र हवामान होते. या कालावधीत सुमारे २,९२३ जणांचा मृत्यू झाला. जवळपास २० लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. ८० हजार घरे नष्ट झाली आणि ९२ हजारांहून अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला. हा आकडा अधिकही असू शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. बिहारमध्ये ६४२, हिमाचल प्रदेशात ३६५ आणि उत्तर प्रदेशात ३४१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीच्या नायब राज्यपालांना नोटीस

पंजाबमध्ये सर्वाधिक प्राणी मृत्युमुखी पडले. हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक घरांचे नुकसान झाले. केरळमध्ये हवामान बदलाच्या सर्वाधिक ६७ दिवसांची नोंद झाली, तर राज्यात ६० जणांचा मृत्यू नोंदवले गेले. तेलंगणात ६२ हजार हेक्टरपेक्षा अधिक पीक क्षेत्रावर परिणाम झाला. या राज्यात प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे.

कर्नाटकात सुमारे ११ हजारांहून अधिक घरे जमीनदोस्त झाली. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानलाही हवमान बदलाचा मोठा फटका बसला. आसाममध्ये तीव्र हवामानामुळे १०२ दुर्घटनांची नोंद झाली, तर ४८ हजार हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावरील पिके नष्ट झाली. नागालँडमध्ये १,९०० घरे उद्ध्वस्त झाली. फेब्रुवारी महिना गेल्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिवृष्टी, पूर, भूस्खलनामुळे मोठा विध्वंस

नऊ महिन्यांतील २७३ दिवसांपैकी १७६ दिवस वीज कोसळणे आणि वादळामुळे देशात कुठेना कुठे दुर्घटनांची नोंद झाली. त्यात ७११ जण मृत्युमुखी पडले. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये झाले. अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळेही मोठा विध्वंस झाला. त्यात १,९०० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले.