लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेटीत आशीष देशमुख यांचा सवाल
गेल्या पाच वर्षांत नागपूरकरांच्या जीवनात काय बदला झाला, त्यांची आर्थिक संपन्नता वाढली का, मिहान, बुटीबोरी, हिंगण्यात एकतरी नवीन कंपनी आणली का, युवकांना नोकऱ्या मिळाल्या का, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी दिले. आज शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे मुख्यमंत्री बारामती, लातूर, नांदेडचा विकास करू शकतात. प्रत्येक घरात आर्थिक संपन्नता आणू शकतात तर देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात आर्थिक संपन्नता आणायला कुणी थांबवले आहे? अडीचशे शहर बसेस धूळखात पडल्या असताना मेट्रोची काय गरज आहे? फडणवीस चारवेळा आमदार, एकदा मुख्यमंत्री होऊन काही करू शकले नाहीत तर आता पुन्हा आमदार बनून काय करणार आहेत? फडणवीस यांच्याविरोधात रोष आहे. महाराष्ट्रात जात हा घटक कायम महत्त्वाचा राहिला आहे. जर ही निवडणूक जातीवर गेल्यास मुख्यमंत्र्यांना कठीण होणार आहे. राज्याला भेडसावणारे प्रश्न सोडून ३७० आणि बालाकोटसारख्या मुद्यांवर हे मतदान मागत असतील तर जात घटकाला महत्त्व प्राप्त होऊ शकते. तसे झाल्यास नवल वाटू नये, असे सूचक विधानही देशमुख यांनी केले.
हिमाचल प्रदेशात सफरचंदच्या बागा खरेदी करता येत नाही. ईशान्येकडील राज्यात जमीन खरेदी करता येत नाही. मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भातील आदिवासींच्या जमीन खरेदी करू शकत नाही. अशास्थितीत ते जेव्हा ३७० सांगतात तेव्हा मी ३७१ (क) मुद्दा समोर आणतो. फडणवीस यांनी सांगावे, पाच वर्षांच्या कार्यकाळात मागास विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी काय तरतूद केली? या अनुच्छेदामुळे राज्यपालांना मागास प्रदेशाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधी देण्याचे अधिकार आहेत. राज्यपालांनी घटनात्मक अधिकाराचा वापर करून हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणीही देशमुख यांनी केली.
विदर्भ वेगळा झाल्यास विकास शक्य
विदर्भातील मुख्यमंत्री, अर्थमंत्री असताना येथे पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत, आर्थिक अनुशेष दूर झाला नाही. तेलंगणा राज्यात तीन-चार वर्षांत मेडीगट्टासारखा सिंचन प्रकल्प पूर्ण झाला. स्वतंत्र राज्य असल्यामुळे ते शक्य झाले. वेगळा विदर्भ झाल्यास विकास शक्य आहे. फडणवीस विदर्भासाठी मते मागून मुख्यमंत्री झाले आणि मुंबईत जाऊन विदर्भाला विसरले, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.