नागपूर : सरळसेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घ्या अशी अनेक वर्षांपासूनची विद्यार्थी संघटनांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली होती. त्यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळाने नुकतीच केरळ लोकसेवा आयोगाला(केलोआ) भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात सकारात्मक चर्चा झाली असून भविष्यात ‘केलोआ’च्या धर्तीवर ‘एमपीएससी’मार्फत राज्यातील सर्व परीक्षा होणार आहे. केरळ राज्यातील सर्व परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात हे उल्लेखनिय.

सरकारच्या विविध खात्यांतील वर्ग दोन व तीनची पदे पूर्वी ‘महापरीक्षा पोर्टल’मार्फत भरली जात होती. परंतु, तोतया उमेदवार, गुणांमध्ये फेरफार अशा प्रकारांमुळे पोर्टल बंद करून ‘महाआयटी’तर्फे कंपन्यांना काम देण्यात येऊ लागले. त्यालाही विरोध झाला व ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी झाली. त्यामुळे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. लिपिक-टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे ‘एमपीएससी’च्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतरही शासनाने ७५ हजार पदांच्या भरतीसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांना कंत्राट दिले. अनेक विभागांच्या परीक्षा या दोन कंपन्यांकडून सुरू असून यात गैरप्रकाराचे आरोप झाले. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घेण्याचा निर्णय घेतला. .

केरळच्या बैठकीत काय झाले?

सरळसेवा भरती एमपीएससीमार्फत घेण्यासंदर्भात जुलै २०२४ मध्ये शासन निर्णयही काढण्यात आला. या भरतीमधून केवळ वाहन चालक पद वगळण्यात आले. शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पदभरतीची कार्यवाही ही टीसीएस आणि आयबीपीएस या कंपनीकडून सुरू राहील. त्यानंतर ‘एमपीएससी’च्या कक्षेत सर्व पदे आणून १ जानेवारी २०२६ नंतर गट-ब (अराजपत्रित) व गट- क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’कडून होणार आहे. यानुसार, एमपीएससीने कार्यवाही सुरू केली आहे. केरळ राज्यातील सर्व परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. त्यामुळे ‘एमपीएससी’चे सदस्य आणि काही अधिकाऱ्यांनी नुकतीच केरळ आयोगाची भेट घेऊन तेथील परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला. यावेळी सकारात्मक बैठकही घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आयोगातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी परीक्षा ही गोपनिय बाब असल्याने तुर्तास या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

केरळ लोकसेवा आयोग कसा आहे?

एमपीएससीप्रमाणेच केरळ लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था आहे. केरळ राज्य शासनाची सर्व कार्यालये, ज्यामध्ये केरळ राज्य वीज मंडळ, केरळ राज्य परिवहन मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, १५ शिखर सहकारी संस्था व जिल्हा सहकारी संस्था, केरळ राज्याच्या सर्व कंपन्या आणि मंडळे आदी सर्व विभागांतील रिक्त पदांची भरती केरळ लोकसेवा आयोगाकडूनच होते. वर्षाला १५ ते २० हजार पदांची भरती केली जाते. त्यांच्या आयोगाची सदस्य संख्या २० असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १६०० आहे.