नागपूर : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते खुद्द शरद पवार यांनी नागपुरात विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसे मला भेटली आली होती. त्यांनी मला २८८ जागांपैकी १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. त्यावर थेट संधान साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात चौफेर फटकेबाजी केली.

नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड दृष्टि या सोशल मीडिया मॉनिटरिंग साधनाचे सादरीकरण पाहण्यासाठी पोलीस मुख्यालयात आले असता माध्यमांशी साधलेल्या संवादात मुख्यमंत्री म्हणाले, ही सलीम जावेदची स्टोरी चालली आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अश्या प्रकारे तुमच्याकडे कोणी आले तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही. निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही.. तुम्ही त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का..? त्यामुळे या सलीम जावेदच्या स्टोरी बंद केल्या पाहिजेत.

पवार यांनी नागपुरातून सुरू केलेल्या मंडल यात्रेबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसीची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला पाण्यात पाहिले. कोणत्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. ओबीसी समाजाचा केवळ भाषणापुरता वापर केला. आता समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर ते यात्रा काढत आहे. नुसती यात्रा काढून चालणार नाही तर ओबीसीच्या पाठीशी ठाम उभे आहात हे कधीतरी दिसू द्या. ज्यावेळी ओबीसीवर संकट येते त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरो वा कुंजरो वा असते. हे ओबीसींनी पाहिले आहे. तरीही तुम्हाला ओबीसींची आठवण आली असेल तर ती कृतीतही दिसेल, अशी अपेक्षा करतो.

गोळा दागा आणि पळून जा…

विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या मतचोरींच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शूट अँड स्कूट म्हणजे गोळा दागा आणि पळून जा ही राहुल गांधींची रणनीती आहे. ते महाराष्ट्राच्या निवडणुकीवर इकडे तिकडे बोलत आहेत. पण निवडणूक आयोगाला समोर जायची त्यांची हिंमत नाही. ईव्हिएम हॅक करून दाखवा, असे निवडणूक आयोगाने खुले आव्हान दिले आहे.  त्यांना पत्र देत आहे, नोटीस पाठवत आहे. आणखी कोणते जाहीर निमंत्रण हवे आहे.

हे सगळे थोतांड

मत चोरीच्या नावाखाली देशातले मोठ मोठे नेते सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्परंसी तयार करत आहे. ते एकमेकांनाच भेटून देत आहेत. माझी अपेक्षा होती हे देशातले मोठे नेते आहेत . कोणी जर अशा प्रकारे फसवणुकीचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पोलिसांना का कळवले नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. कारण निवडणूक आयोगांनी ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं चार वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ते स्वीकारायला हे नेते तयार नाहीत.

ठाकरेंनी सुखात नांदावे

बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्यावरून कानावर हात ठेवत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते काय बोलले मला माहिती नाही. ठाकरे एकत्रित आले या विषयावर किती दिवस तेच ते सांगत बसणार. ते एकत्र आलेत तर एकत्र नांदावे, एकत्र लढावे काय करायचे ते करावे. मी यावर फार बोलू इच्छित नाही.