वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्धा जिल्ह्यावर विशेष प्रेम असल्याचा दावा भाजप आमदार करीत असतात. प्रथम समृद्धी व आता शक्तिपीठ मार्ग, दोन मेडिकल कॉलेज, नॉलेज हब, उडता सौर ऊर्जा प्रकल्प, सिंचन निधी व अन्य विविध कामे खुद्द फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यात मंजूर केल्याचे व काही मार्गी लावल्याचे आमदार निदर्शनास आणतात. त्यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्यासाठी वाट्टेल ते करीत तिकीट आणणे व राज्यातील शेवटची प्रचारसभा आर्वीत घेणे, या बाबी पण लक्षात आणून दिल्या जातात.

आता ३ ऑगस्टचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा चर्चेत आला आहे. अमरावती जिल्ह्यात मोर्शी येथे नवे मत्स्य विज्ञान महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. त्याच्या बांधकामचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नागपुरातून कारमार्गे अमरावतीत जाणार. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यात कारंजा येथून जातो. जर मुख्यमंत्री गावातून जात आहे तर त्यांची भेट व्हावी अशी ईच्छा कारंजा भाजप नेत्यांनी स्थानिक आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे व्यक्त केली. तशी लगबग सूरू झाली.

मुख्यमंत्री येणार तर निमित्ताचा काही कार्यक्रम हवा, म्हणून प्रशासनास सूचित करण्यात आले. आमदार सुमित वानखेडे हे मात्र म्हणतात की अद्याप मुख्यमंत्री यांचा दौरा अधिकृत निश्चित झालेला नाही. पण पूर्वतयारी सूरू आहे. बघू या काय निश्चित होणार ते. पण एक दोन भाजप आमदारांनी काहींना कामासाठी कारंजा येथेच ३ ऑगस्टला येण्याचे सांगून टाकले आहे. तसेच माहिती यंत्रणा पण तयारीत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री फडणवीस ये यावेळी जिल्ह्यात थांबले तर त्यांची ही वर्षभरातील चौथी जिल्हाभेट ठरणार.

उपमुख्यमंत्री असतांना आर्वीत प्रचारसभा, त्यानंतर आर्वीत विविध लोकार्पण सोहळ्यास, नुकताच सेवाग्राम दौरा व आता ३ ऑगस्ट. म्हणजेच फडणवीस हे वर्षभरात चौथ्यांदा भेट देतील. मुख्यमंत्र्यांचा अमरावतीत सकाळी ११ वाजता कार्यक्रम असल्याचे निमंत्रण आहे. या कार्यक्रमाची पण एक गंमत पूढे आली. हा कार्यक्रम निश्चित झाला.पण या कार्यक्रमाचे निमित्त असलेल्या कामास प्रशासकीय मंजुरीच प्राप्त झाली नव्हती. विना मंजूर कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री कसे करणार ? हा लाखमोलाचा सवाल उभा झाला.

शेवटी धावपळ करीत प्रशासकीय मंजुरीचा आदेश १ ऑगस्टला काढण्यात आला. या दिवशी सायंकाळी ४ वाजता आदेश निघाला आणि आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता वर्धेकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्या निश्चितीनंतरच निश्वास टाकतील, असे गंमतीत म्हटल्या जात आहे.