यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, शनिवारी येथे सुरू असलेल्या मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वासाठी यवतमाळात येणार असल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू आहे. माजी खासदार विजय दर्डा हे आयोजक असलेल्या रामकथा पर्वाचे आयोजन येथील दारव्हा मार्गावरील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात सुरू आहे. आध्यात्मिक संत मोरारी बापू यांच्या अमृतवाणीतील हे पर्व १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या कथा पर्वात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी यवतमाळात येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपने मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलकही जागोजागी लावले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा अद्याप आलेला नाही. तरी, जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी विविध समित्या गठित केल्या आहेत.रामकथा पर्वातील उपस्थितीनंतर मुख्यमंत्री काही शासकीय कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत.
आता शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या रामकथा पर्वात उपस्थित राहण्यावरून टीका होत आहे. जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने मोठी हानी झाली आहे. शेतकरी विवंचनेत असताना राज्याचे कृषिमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री कोणीही जिल्ह्यात भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही.
आता खुद्द मुख्यमंत्री आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात येत असताना ते सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी धार्मिक कार्यक्रमास प्राधान्य देत असल्याने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी टीका शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नाही, मात्र रामकथा ऐकण्यासाठी वेळ असल्याची टीका जाधव यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी वेळ मागूनही अद्याप वेळ दिली नसल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.
मोरारी बापू म्हणतात, झाडे लावा!
पाऊस संपूर्ण वनराईला सिंचित करतो. मात्र, आपण संपूर्ण समाजाला आधार देवू शकत नाही. परंतु, अंगणातल्या झाडांना आपण नक्की आधार देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल तिथे किमान पाच झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आध्यात्मिक संत तथा कथाकार मोरारी बापू यांनी केले. आपण राहतो त्या परिसरात झाडे लावा, पाणी द्या हीच आपली दक्षिणा असल्याचे ते म्हणाले.
गुरुवारच्या सत्रात मोरारी बापू यांच्या मानस रत्नावली आणि मानस हनुमान या दोन रामकथांचे प्रकाशन चित्रकूट धाम ट्रस्टच्या वतीने संपादक नितीनभाई वडगामा यांच्या हस्ते करण्यात आले. या रामकथा पर्वाचा रविवार, १४ सप्टेंबर रोजी समारोप होत आहे. त्यामुळे रविवारी ही कथा सकाळी ८ ते ११ या वेळात होणार आहे.