संजय बापट, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून तर देवेंद्र फडणवीस यांना खोटय़ा प्रकरणात अडकवून संपविण्याचा घाट घातल्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार पाडल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. तसेच प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार विकणारेच आता लिंबू-टींबूची भाषा करताहेत. त्यामुळे चूक मान्य करून सत्याला सामोरे जा आणि राज्यातील जनतेची माफी मागा असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात सरकारच्या सहा महिन्यांतील कामगिरीचा आढावा मांडताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर अधिवेशन काळातील दिल्ली दौरा आणि रेशीमबाग या संघ मुख्यालयातील भेटीवरून जोरदार टीकास्त्र सोडले होते. तसेच अधिवेशन काळात विरोधकांनी शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत जोरदार निदर्शने केली होती. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह विरोधकांनाही सुनावले.

बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम आम्ही करीत आहोत, त्यामुळे रेशीमबागेत गेलो. तुमच्यासारखे गोिवदबागेत (शरद पवार यांचे बारामतीमधील निवासस्थान) गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला. घरातून बाहेरही न पडणाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणे, हा मोठा विनोद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महापुरुषांचा सन्मान करण्यास कुणाकडून शिकण्याची गरज नसल्याचे सांगत ‘‘छत्रपतींच्या वारसदाराकडे वंशज असल्याचे पुरावे कोणी मागितले? संभाजीराजांकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र कोणी मागितले, छत्रपतींना जाणता राजा म्हणूू नका, असे कोणी सांगितले? अशी विचारणा करीत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांचे गृहमंत्री तुरुंगामध्ये गेले, दाऊदशी संबंध असलेला मंत्री तुरुंगामध्ये गेला, त्यांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारू नये, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला. सत्तेवर आल्यापासून हे सरकार पडेल, असा दावा विरोधक करीत आहेत. पण हे सरकार आपला कालावधी भक्कमपणे पूर्ण करेल. तसेच येणाऱ्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती बहुमताने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

हिऱ्यापोटी निपजली गारगोटी

प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीतींविरोधात लढले. त्याच प्रबोधनकारांचे वारसदार लिंबू फिरवण्याची भाषा करू लागले आहेत. या लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली. ‘हिऱ्यापोटी निपजली गारगोटी’ असा हा प्रकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

विधानसभेत राजकीय भाषण होत नाही, पण तुम्ही सारखे तेच सांगत आहात. सहा महिन्यांपूर्वी काय घडले, हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जुलैच्या भाषणातील बरेचशे दाखले पुन्हा दिलेत. त्यातून बाहेर या. आता मुख्यमंत्री झाला आहात, असल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीत मन रमवू नका. तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांना जास्त लक्ष्य करत आहात, मुले म्हणून सोडून द्या, तुमच्या प्रवक्त्यांना बाहेर बोलायला सांगा, सभागृहात ते सांगू नका असा टोलाही पवारांनी लगावला.

मलाही तुरुंगात डांबण्याचा कट फडणवीस

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात डांबण्यासाठी कटकारस्थान करण्यात आले होते. त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुडाचे राजकारण आम्ही नव्हे तर तुम्ही केले, असे प्रत्युत्तरही फडणवीस यांनी विरोधकांना दिले. 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde gave reasons of rebelled against maha vikas aghadi zws
First published on: 31-12-2022 at 02:41 IST