scorecardresearch

विद्यापीठातील छळ प्रकरणात चौकशी समितीचा फार्स!

विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापकाद्वारे ‘आरएसी’मध्ये दोन विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याची तक्रार होती.

समिती सदस्यांकडून तक्रारकर्त्यांवरच दबाव?

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातील छळ प्रकरणात नेमण्यात आलेली चौकशी समिती केवळ फार्स ठरत असल्याची चर्चा आहे. तक्रार करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनींना चौकशी समितीने बयाण नोंदवण्यासाठी बोलावले असता समितीमधील एका सदस्याने विद्यार्थिनींचीच उलट तपासणी केल्याची माहिती समोर येत आहे. तुम्ही तक्रारच का केली, कुणी रागावले म्हणून तक्रार करावी लागते का, अशा शब्दात विद्यार्थिनींनाच सुनावल्याने समितीमधील सदस्यांकडून निष्पक्ष न्यायाची अपेक्षा कशी करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापकाद्वारे ‘आरएसी’मध्ये दोन विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याची तक्रार होती. आधी चौकशीला विलंब करणाऱ्या विद्यापीठाने नंतर नाईलाजाने माजी न्यायाधीश मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. आता समितीचे कामकाज सुरू करण्यात झाले आहे. सुरुवातीला समितीने मानव्यविज्ञान शाखेच्या अधिष्ठात्यांसह संबंधित व्यक्तींचे बयाण नोंदवले. त्यानंतर  तक्रार देणाऱ्या विद्यार्थिनींना बोलावण्यात आले. यावेळी समितीमधील एका सदस्याने या विद्यार्थिनींवर दबाव टाकल्याची माहिती आहे. चौकशी समितीने निष्पक्षपणे बयाण नोंदवावे ही अपेक्षा असते. मात्र, असे न करता त्या सदस्याने विद्यार्थिनींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे, विद्यापीठाकडे या प्रकरणात तक्रार येऊनही यावर कुठलीच कारवाई नाही. विधिसभेच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाल्यावरही प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू होता. अखेर सर्वच स्तरातून दबाव वाढल्याने विद्यापीठाने चौकशी समिती नेमली. मात्र समितीच्या कार्यशैलीवरच आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नियमाला बगल

साक्ष नोंदवण्यासाठी आरोपींना आधी न बोलावता इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदवण्यात येत आहेत. नियमानुसार समितीने सर्वात आधी तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांची बाजू ऐकून घ्यायला हवी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, असे न करता  तक्रारकर्त्यांनाच शेवटी बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Complainants pressured by committee members in university harassment case zws

ताज्या बातम्या