यवतमाळ : पुसद येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी करिअर ॲडव्हांसमेंट स्कीम (सीएएस) अंतर्गत तीन प्राध्यापकांना देण्यात आलेली पदोन्नती नियमबाह्य असल्याची तक्रार शिक्षण विभाग व विद्यापीठाकडे करण्यात आल्याने या नियुक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रा. डॉ. छाया कोकाटे यांनी विद्यापीठ आणि शासनाला सादर केलेल्या तक्रारीत हा संपूर्ण प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली आहे.श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात २६ एप्रिल २०२३ रोजी प्रा. डॉ. रजनी भोयर (प्राध्यापक ग्रेड), प्रा. डॉ. असीम खापरे (प्राध्यापक ग्रेड) आणि प्रा. डॉ. अरुणा पवार (सहाय्यक प्राध्यापक ग्रेड) यांना ‘कॅस‘ अंतर्गत पदोन्नती देण्यात आली. ज्या दिवशी या नियुक्तीसंदर्भात बैठक झाली त्या समितीचा कोरम पूर्ण नसल्याचा आरोप आहे. प्लेसमेंटच्या वेळी काही समित्यांत फक्त दोन किंवा तीन सदस्य उपस्थित असल्याची तक्रार आहे.

शिवाय सहसंचालक शिक्षण विभाग व संस्थेचे प्रतिनिधीही अनुपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान महाविद्यालयाचे तत्कालीन कार्यकारी प्राचार्य समितीच्या सभागृहात एकदाही हजर नव्हते. निवड समितीचा शिफारस अहवाल उशिरा सही करून पूर्ण करण्यात आला. तसेच रजिस्टरमध्ये नोंदही उशिरा घेण्यात आल्याचे म्हटले आहे. समितीने पदोन्नती दिलेले प्रा. डॉ. असीम खापरे यांना पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५% गुण नसतानाही प्राध्यापक ग्रेडची पदोन्नती कशी दिली, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर नियुक्ती देण्यात आलेल्या प्रा. डॉ. अरुणा पवार महाविद्यालयात अजूनही कायमस्वरूपी नाही.

त्यांचे नेट, सेट नसल्याने त्यांना कायमस्वरूपी मान्यता नाही. तरीही त्यांची सेवा सुरू आहे. त्यांचे विद्यापीठाचे स्थायी मान्यतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्यांना पदोन्नतीचा लाभ कसा मिळाला, असा प्रश्न तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे.

तक्रारीसोबत फोटो, जिओटॅग माहिती व संबंधित लिंकही सादर करण्यात आली आहे. ज्यावरून समितीचा कोरम अपूर्ण असल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य ठरणाऱ्या पदोन्नती तत्काळ रद्द करण्याची मागणी विद्यापीठ व शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच या प्राध्यापकांनी आतापर्यंत पदोन्नतीचे लाभ घेतले असतील तर त्याची परतफेड घेण्यात यावी आणि या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. नियुक्ती संदर्भात शासन आणि विद्यापीठाचे नियम असताना ते डावलून नियमबाह्य नियुक्ती करून शासनाची दिशाभूल करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पदोन्नती नियमानुसारच – प्राचार्य भोयर

या पदोन्नती देण्यात आल्या तेव्हा वंदना वानखडे या कार्यकारी प्राचार्य होत्या. या संदर्भात त्यांना विचारले असता, ‘सध्या प्राचार्य पदाचा प्रभार डॉ. रजनी भोयर यांच्याकडे आहे. मला या प्रकरणासंदर्भात काही माहिती नाही’, असे उत्तर प्रा. वंदना वानखडे यांनी दिले. महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्य रजनी भोयर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ‘विद्यापीठ नियमबाह्य नियुक्ती कशा करतील असा प्रश्न विचारून तिन्ही प्राध्यापकांच्या पदोन्नती नियमानुसार आहेत, असे सांगितले.

ज्यांनी ही तक्रार केली, त्यांच्या पदोन्नतीवेळी सेवानिवृत्त प्राध्यापक समितीत होते. त्यांच्याही नियुक्तीची चौकशी व्हावी, असे सांगितले. ही अंतर्गत बाब असून, यात मानहानीचा धोका असल्याने पेपरबाजी होवू नये’, असा इशाराही प्राचार्य भोयर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला. यासंदर्भात सह संचालक (उच्च शिक्षण) डॉ. केशव तुपे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले. त्यानंतर सातत्याने संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.