अनिल कांबळे

नागपूर : गेल्या काही महिन्यांपूर्वीच पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यानंतरही पदोन्नत्या होत नसल्यामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ‘खदखद’ निर्माण झाली आहे. पोलीस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात ताळमेळ नसल्याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना सोसावा लागत असल्याची भावना अनेक अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य ताळमेळ नाही. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातूनही पोलिसांच्या बदल्यांबाबत अनेक सूचना वारंवार येत असतात. महासंचालक कार्यालय आणि मंत्रालयातील समन्वयाच्या अभावाचा फटका राज्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांसह ‘आयपीएस’ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या १११ व्या तुकडीतील २०० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्याच तुकडीतील जवळपास ३०० उपनिरीक्षकांना ९ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही पदोन्नती नाही. तसेच ११२ तुकडीतील अधिकारीसुद्धा पदोन्नतीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. यासह १०२ आणि १०३ तुकडीतील सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने गेल्या ४ महिन्यांपूर्वीच माहिती मागितली. अधिकाऱ्यांनी सर्व माहिती तातडीने पाठविल्यानंतरही अद्यापर्यंत पदोन्नतीसंदर्भात कोणतीही हालचाल झाली नाही. १०४ ते १०८ तुकडीतील काही कनिष्ठ अधिकारी न्यायालयात गेल्याचे कारण सांगून १०३ तुकडीला पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यासह २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५२० हवालदारांची पदोन्नतीसाठी निवड केली. मात्र, सहा महिन्यांपासून त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. पोलीस निरीक्षकही काही महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात समन्वय नसल्याने त्यांनाही पदोन्नती मिळाली नाही.

विनंती बदल्या केव्हा?
राज्यातील अनेक पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी जी पात्रता असते ती पूर्ण करीत अर्ज केले. मात्र, पोलीस विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच विनंती बदल्या रखडल्या. अनेक अधिकाऱ्यांना वैद्यकीय कारणासह अर्ज केले, तरीही बदल्यांवर अद्याप विचार झाला नाही. त्यामुळेसुद्धा राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी न्यायालयीन अडचणी होत्या. त्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता न्यायालयीन अडचण निकाली निघाली. त्यामुळे आता पोलीस निरीक्षकांना लाभ मिळणार आहे. त्यांच्या झालेल्या रिक्त जागी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येईल. – संजीव कुमार सिंघल, अपर पोलीस ,महासंचालक, मुंबई. (आस्थापना विभाग)