१०० टक्के क्षमतेने प्रवास  मुभा

नागपूर : देशात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने  केंद्र सरकारने विमान क्षमतेच्या १०० टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावरील विमानांची रेलचेल वाढण्याची शक्यता आहे.

करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ  लागल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच, देशात व्यापक प्रमाणावर लसीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे निर्माण झालेली असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. असे असताना केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय येत्या १८ ऑक्टोबरपासून अर्थात सोमवारपासून देशभर लागू करण्यात येणार आहे.

१ जुलै ते ५ जुलै दरम्यान देशातील विमान कंपन्यांना ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान मर्यादा ६५ टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली. पुढे १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये ही मर्यादा ७२.५ टक्के इतकी वाढवण्यात आली होती. तर १८ सप्टेंबरपासून या महिन्यात १८ ऑक्टोबरपर्यंत ही मर्यादा ८५ टक्के इतकी नेण्यात आली आहे. आता १०० टक्के प्रवासी वाहून नेता येणार आहे. विमान वाहतूक कंपन्यांचा तोटा कमी होणार असल्याने सर्व खासगी विमान वाहतूक कंपन्यांना वेळापत्रकानुसार सर्व विमान सेवेत आणतील, असे अपेक्षा आहे.