सत्तेपासून दूर राहावे लागलेल्या काँग्रेसला नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी कामठी नगर परिषदेतील विजयाने ऊर्जा दिली आहे. शहर काँग्रेसने कामठी विजयाचा पॅटर्न मुस्लीम आणि दलित-बहुजन बहुल वस्त्यांमध्ये राबवण्याची व्यूहरचनेवर विचार सुरू केला आहे. त्यासाठी दोन उमेदवारांचा एक गट गृहीत धरून गुप्त पद्धतीने सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे.

शहराला लागून असलेल्या कामठी नगर परिषदेत काँग्रेसने ३२ पैकी १६ जागा आणि नगराध्यक्षपद जिंकले. हा विजय नागपूर महापालिकेच्या तोंडावर आल्याने काँग्रेसजनांचा उत्साह वाढला आहे. कामठी शहरात मुस्लीम, दलित-बहुजन मतदार अधिक आहेत. या नगर परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यानंतरही पराभव झाला. हाच मुद्दा काँग्रेसने कार्यकर्त्यांसमोर मांडून जोश भरण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी देवडीया काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवर कामठी निकालाचे पडसाद दिसून आले. मुलाखतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ‘कामठी पॅटर्न’ची चर्चा होती. शहरातील मोमीनपुरा, जाफरनगर आणि उत्तर नागपूर, दक्षिण नागपुरातील दलित-बहुजन वस्त्यांमध्ये उमेदवारांची निवड आणि प्रचाराची दिशा ठरण्याचे सूत्र काँग्रेसला सापडले आहे.

मोमीनपुरा आणि कामठी याचे घनिष्ठ संबंध आहे. कामठीतील बहुतांश मुलांची पत्नी मोमीनपुऱ्यातील आणि मोमीनपुऱ्यातील बहुतांश मुलाने कामठीतील मुलीशी विवाह केले आहेत. कामठीतून काँग्रेस विजयाचा संदेश मोमीनपुऱ्यात आणि नंतर इतर वस्त्यांमध्ये जाईल. याची रणनीती तयार केली जात आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत माजी नगरसेवक अशफाक पटेल यांची पत्नी जैतुनबी अंसारी यांना उमेदवारी दिली आणि त्या विजय ठरल्या. यामुळे मुस्लीम बहुल मोमीनपुऱ्यात पहिल्यांदाच कमळ फुलले.

जैतुनबी यांना उपमहापौर करण्यात आले. परंतु गेल्या दोन वर्षांत राज्याने आणि अडीच वर्षांत केंद्र सरकारने मुस्लीम समाजाविषयी घेतलेली भूमिका हे मुद्दे अजेंडय़ात घेतले जाणार आहेत. तसेच राज्याने मुस्लिमांना शिक्षणात आणि नोकरीत नाकारलेले आरक्षण यावर भर देऊन सामाजिक धृवीकरण घडवून आणले जाईल, अशी व्यूहरचना राहणार आहे, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.

देवडीया काँग्रेस भवनातून बी फॉर्म

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना कोणते दोन उमेदवारांचा गट कोणत्या प्रभागात सक्षम ठरू शकेल. याचा गुप्त सव्‍‌र्हे एका खासगी संस्थेमार्फत करण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे उमेदवारीसाठी दावा करत असलेल्या कार्यकर्त्यांची ताकद सव्‍‌र्हेतून काही प्रमाणात पक्षाला कळू शकणार आहे. मुलाखतीमधून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रदेश काँग्रेसकडे गेल्यानंतर बी फॉर्म शहर काँग्रेसकडे येतील. देवडीया काँग्रेस भवनातूनच बी-फॉर्म वितरित केले जाणार आहेत.

‘शहराचा एक भाग असलेल्या कामठीत काँग्रेसला विजय मिळल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडली आहे. शहर काँग्रेस गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करीत आहे. प्रभागनिहाय समित्या आणि पक्ष बांधणी झाली आहे. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक माजी अपक्ष नगरसेवकांनी पक्षात प्रवेश घेतला नाही. परंतु उमेदवारी अर्ज केले आणि मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेससाठी अतिशय सकारात्मक वातावरण आहे.’

– विकास ठाकरे, शहराध्यक्ष काँग्रेस