चंद्रपूर : मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. सैनिकांच्या सन्मानार्थ बोलण्याऐवजी भाजपचा हरामखोर व नालायक मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफीया कुरेशी यांच्याबाबत अपमानास्पद टिपणी केली. अशा मंत्र्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करीत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

काँग्रेसतर्फे चंद्रपूर शहरात आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत हाेते. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या चार पिढ्या देशसेेवेसाठी झिजल्या आहेत. अशा कर्तबगार कर्नल सोफीया कुरेशी यांच्याबद्दल भाजपचे मंत्री विजय शाह अपमानास्पद टिपणी करतात. ते हरामखोर व नालायक आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

भरपावसात काँग्रेसची तिरंगा यात्रा

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांच्या सन्मानार्थ आणि शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज काँग्रेसने भरपावसात तिरंगा यात्रा काढली. स्थानिक गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली.

यात्रेत आमदार वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शहराध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात्रेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यात्रेत विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, सुनीता लोढिया, चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, सतिश वारजूरकर, महिला काँग्रेस अध्यक्ष सुनंदा धोबे, वैरागडे, अमजद अली, प्रशांत भारती यांच्यासह काँग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमदार वडेट्टीवार-खासदार धानोरकर प्रथमच एकत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या दोन नेत्यांमधील मतभेद सर्वत्र चर्चेचा विषय असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर तिरंगा यात्रेच्या निमित्ताने प्रथमच काँग्रेस पक्षात एकजूट बघायला मिळाली. यानिमित्ताने आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर आपसातील मतभेद विसरून प्रथमच एकत्र आले. आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. मागील अनेक कार्यक्रमात काँग्रेसचे हे दोन्ही नेते एका मंचावर येणे टाळत होते. मात्र, आज दोन्ही नेते तिरंगा ध्वज हाती घेवून यात्रेत एकत्र चालताना दिसले. यासोबतच गटबाजीत विखुरलेले काँग्रेसचे इतरही नेते प्रथमच एकदिलाने एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले.