वर्धा: संघटन हीच खरी शक्ती, हे उमगलेल्या भाजपने संघटना सर्वोच्च असल्याचे कार्यकर्त्यांत ठसविले. प्रथम संघटना नेता व मग मंत्री, असा मान. त्याचीच फळे ते चाखत असल्याचे म्हटल्या जाते. उलट काँग्रेसीचे वेगळेच. काँग्रेस हा जनतेचा पक्ष. त्यामुळे मूठभर संघटना पदाधिकारी नव्हे तर जनतेस घेऊन आम्ही चालतो, असा गंड घेऊन काँग्रेस वरिष्ठ वाटचाल करीत आल्याचे पक्षाचे नेतेच म्हणतात. पण आता उतरणीचा काळ काँग्रेस नेत्यांना धडे देत आहे. त्याचाच हा दाखला.
संघटना निवडणुकीच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरते म्हणून बूथ लेव्हल, ब्लॉक लेव्हल पदाधिकारी नेमण्याचा भाजपचा शिरस्ता आहे. त्या वाटेवर काँग्रेसने पाऊल टाकले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तसे पाऊल टाकले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदार याद्यामध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही निवडणूक कार्यालयाकडून मिळालेली नाही.
या परिस्थितीत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीचे महत्व लक्षात येते. मतदार यादीतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय आपल्या पक्षाच्या बूथ लेव्हल एजेंटच्या नियुक्ती कार्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या सूचनेचा संदर्भ देत हे निर्देश दिलेत.
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन बीएलए नियुक्तीस प्राधान्य द्यावे. सर्व जिल्हाध्यक्ष तसेच ब्लॉक अध्यक्ष यांनी आपल्या पक्षाचे प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नियुक्त करण्याबाबत दक्षता घ्यावी. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे नोंदणीचा अर्ज दाखल करावा. त्याची एकत्रित ब्लॉकनिहाय यादी प्रदेश कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठवावी, अशी सूचना प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून आलेली आहे.
काही जिल्ह्यात मात्र अशी सूचना होण्यापूर्वीच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बूथ कार्यकर्ता तयार करून ठेवल्याची उदाहरणे आहेत. पण आघाडीच्या राजकारणात मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यास पण देण्याची भूमिका आली. त्यामुळे पक्षाच्या मूळ कार्यकर्ता बाजूस पडत गेला. कधी सर्वांना सामावून घेण्याची भूमिका काँग्रेस उमेदवाराने घेतल्याने मग एकानेही मनापासून काम नं करण्याचा प्रकार घडला. भाजप उमेदवारास ही कटकट कधीच भासली नाही. कारण प्रथम पक्षाचा कार्यकर्ता पुढे राही. वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम बूथ कार्यकर्ता तयार करण्याचे काम माजी आमदार रणजित कांबळे यांनीच केले. तशी तगडी टीम तयार केली. मात्र यावेळी प्रथमच भाजपचे राजेश बकाने यांनी ती भेदली.