नागपूर : विधानसभेतील दारुण पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनपेक्षितपणे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. परंतु त्यांनी त्यांची कार्यकारिणी जाहीर केली नव्हती. आता बहुप्रतिक्षित कार्यकारिणीची यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. या यादीत नागपुरातील बहुतांश नेत्यांना संधी मिळाली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर कार्यकारिणी निवडीचा पेच होता. अखेर त्यांनी नागपूर शहराचे महत्व लक्षात घेता त्यांनी कार्यकारिणीतील जुन्या नेत्यांना कायम ठेवत काही नवीन चेहऱ्यांना नेत्यांना स्थान दिले आहे. तसेच पटोले यांच्या कार्यकारिणीतील काही नेत्यांना पदोन्नती देखील दिली आहे.
नागपुरातून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून माजी मंत्री अनिस अहमद, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, आमदार अभिजित वंजारी, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची, तर उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार अशोक धवड, ॲड. आसिफ कुरेशी, हिदायत पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, किशोर कन्हेरे, तक्षशीला वाघधरे, विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रवक्ते म्हणून अतुल लोंढे यांना कायम ठेवण्यात आले आहे.
महासचिवपदी अतुल कोटेचा, अभिजित सपकाळ, गिरीश पांडव, हैदर अली दोसानी, युवक कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला काँग्रेसच्या नागपूर शहर अध्यक्ष नंदा पराते, प्रसन्ना तिडके, उमाकांत अग्निहोत्री, जिया पटेल, रवींद्र दरेकर, संदेश सिंगलकर, संजय दुबे, शकुर नागानी, याज्ञवल्क्य जिचकार यांना संधी देण्यात आली आहे. सचिव पदी अभ्युदय मेघे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, काटोल विधानसभेचे संघटक प्रकाश वसु, जयंत दळवी, माजी नगरसेवक नयना झाडे, आर. एम. खान नायडू, सुरेश जग्यासी, विजय सारटकर, मनोज साबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये दिग्गज नेत्यांना स्थान देत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, अविनाश पांडे, गटनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय दर्डा, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, खासदार श्यामकुमार बर्वे, विकास ठाकरे, आ. संजय मेश्राम, सुनील केदार, रामकिशन ओझा, प्रफुल्ल गुडधे, दीपक काटोले, नितीन कुंभलकर यांचा कार्यकारी समितीत समावेश करण्यात आला आहे.
नागपूर जिल्हाध्यक्षपदी अश्विन बैस
विधानसभेत बंडखोरी केल्यानंतर नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी फारसे परिचित नसलेले कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अश्वीन बैस यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाला आष्टनकर नको होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या एका बैठकीत नागपूर जिल्ह्यातील गटबाजी समोर आली होती.