चंद्रपूर : केंद्र, राज्य व स्थानिक राजकारणात ज्यांच्या विरोधात लढायचे आहे, त्याच पक्षाच्या (भाजप) नेत्यांशी प्रत्येक निवडणुकीत कधी छुपी, तर कधी उघड युती करण्याचे धोरण, कार्यकर्ता मोठा होऊ नये हा अंगवळणी पडलेला स्वभावदोष, स्वत:भोवती फिरणारे स्वार्थी राजकारण, नोकरभरती व लालसा, हे घटक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी कारणीभूत ठरले.
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण ३५८ पदांच्या नोकरभरती प्रक्रियेपासून सुरू झाले. या अतिशय वादग्रस्त भरती प्रक्रियेला पहिल्या दिवसापासून माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला. भरतीची एसआयटी चौकशीही लागली. मात्र, तोपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली होती. याच भरती प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपचे काही नेते एकत्र आले. त्यानंतरच्या घडामोडींत बँक निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला. भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, ठाकरे सेनेतून भाजपवासी झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे, अशी युती झाली.
निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात, मतदानापूर्वीच १२ संचालक बिनविरोध निवडून आले. महिला प्रवर्गातून खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध विजयी झाल्या. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे यांचे बंधू तथा बँकेचे माजी संचालक शेखर धोटे यांंच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढवली. तिथूनच खऱ्या अर्थाने या विचित्र युतीच्या फाटाफुटीला सुरुवात झाली. मात्र, तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. तेव्हापर्यंत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यात सहभागी नव्हते. काँग्रेसची नाव बुडत असल्याचे लक्षात येताच खासदार धानोरकर, जिल्हाध्यक्ष धोटे यांनी आमदार वडेट्टीवार यांना सोबत घेतले. तिन्ही नेत्यांनी आम्ही एकत्र आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत भाजप आमदार भांगडिया आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘करेक्ट’ कार्यक्रम करीत ठाकरे सेनेचे शिंदे यांना भाजपमध्ये आणले आणि थेट अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव जाहीर करून टाकले. तेव्हा कुठे काँग्रेस नेत्यांना भाजप आमदाराशी युती करून आपली फसगत झाल्याचे लक्षात आले.
काँग्रेसच्या चार संचालकांनीच स्वपक्षीय नेत्यांना अक्षरश: मूर्ख बनवले. एकीकडे शिंदे यांना छुपा पाठिंबा जाहीर केला, तर दुसरीकडे काँग्रेसचा अध्यक्ष बसवण्यासाठी हालचाली करीत असल्याचे चित्र रंगवले.
पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ
या प्रकारांमुळे काँग्रेस नेत्यांची दोन्ही बाजूंनी फसगत झाली. यापूर्वीही महापौर निवडणूक आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेत्यांनी भाजपशी केलेल्या युतीचा फटका काँग्रेसला बसला होता. नेत्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ आहेत. आगामी काळात महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकांत ज्यांच्या विरोधात लढायचे, त्याच पक्षाच्या नेत्यांशी काँग्रेस नेते युती करीत असल्याने लढायचे नेमके कुणाशी, असा प्रश्न पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडला आहे.