नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी ३० जानेवारीला श्रीनगर येथे राष्ट्रध्वज फडकवून भारत जोडो यात्रेचा समारोप करतील. या कार्यक्रमात मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने आज नागपुरात झालेल्या प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत ‘चलो श्रीनगर’ची  घोषणा दिली.

या यात्रेतील जनमानसातील प्रभाव टिकून राहावा म्हणून काँग्रेस हाथ से हाथ जोडो अभियान २६ जानेवारीपासून सुरू करीत आहे. पहिल्यांदाच मुंबईबाहेर अर्थात नागपुरात झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या अभियानाच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवण्याबाबत चर्चा झाली. तसेच सात ठराव घेण्यात आले. यामध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना, पदोन्नतीमध्ये आरक्षण, नोकर भरती आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व वीजबिल माफी देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार शेतकरी विरोधी आरोप करीत निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे लोहखनिज प्रकल्प आणि पोलाद कारखाना सुरू करण्याचाही ठराव करण्यात आला.

हाथ से हाथ जोडो अभियानाचे महाराष्ट्राचे प्रभारी पल्लम राजू यांनी या अभियानासाठी स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करून ते  यशस्वी करण्याची सूचना केली. प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी निरीक्षकावर असणार आहे. राज्यातील सहा विभागात एक-एक शिबीर ठेवून अभियानाची माहिती दिली जाईल. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.