राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज दुखावला गेला असेल तर कॉंग्रेसच्या हितासाठी राहुल गांधी यांना भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागून हा विषय इथेच संपवायला पाहिजे. ओबीसी समाज दुखावल्यास त्याचा परिणाम कॉंग्रेसला मतदानाच्या स्वरूपात भोगावा लागेल, अशी रास्त सूचना केल्यामुळे पक्षातून काढले, असा आरोप माजी आमदार आशिष  देशमुख यांनी केला. त्यांनी आज एक निवेदन काढले.

हेही वाचा >>> Video : नागझिऱ्यातील ‘ती’ वाघीण पर्यटकांसमोर आली अन्…; स्थलांतरित वाघिणी स्थिरावत असल्याची नांदी

त्यांना कॉंग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले आहे. देशमुख म्हणाले, “निष्कासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांकडे असल्याचे द्योतक आहे. ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले.  मला त्यांनी कारणे दाखवा नोटिस दिली होता. त्यावर मी सविस्तर उत्तर दिले होते. महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी माझे उत्तर सविस्तर प्रसिद्ध केले. त्यात काही तथ्य होते म्हणूनच त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझे उत्तर  महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समाधानकारक वाटत नाही, एवढेच कारण त्यांनी निष्कासनासाठी दाखविले आहे.

हेही वाचा >>> बेपत्ता मुली शोधण्यात नागपूर पोलीस अव्वल; पाच वर्षांत ८८८२ बेपत्ता; ८५०१ मुलींचा शोध

याचा अर्थ मला पक्षातून काढण्याचे आधीच ठरले होते आणि नोटिस नंतर दिला गेला, असाही काढता येतो.  काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी बलिदान दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मात्र स्वातंत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाहीत. त्यांना जो आवडत नाही, त्याला ते दूर करतात.

मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे पक्षातील वजन वाढले तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते. माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी सूचना मी केली. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सूचना लोकतांत्रिक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसतेअसेही ते म्हणाले.