नागपूर : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. अशाप्रकारे महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मतचोरी होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीच्या आधीच बोगस मतदार तपासण्याची मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते व प्रदेश सरचिटणीस गिरीश पांडव यांनी दिली.
लोकसत्ता कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महापालिका निवडणुकीची तयारी, मतदार याद्यांचा अभ्यास, बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठका, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक ब्लॉकमध्ये ‘व्होट चोर गद्दी छोड’ अभियानाअंतर्गंत सुरू असलेली मशाल यात्रा आणि त्याला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत सविस्तर चर्चा केली.
पांडव म्हणाले, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघात सुमारे २३ हजार बोगस मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २०२४ लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे पाच वर्षांत दक्षिण नागपुरात केवळ ४ हजार २५० मतदार वाढले. पण, २०२४ ची लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक म्हणजे पाच महिन्यात सुमारे २४ हजार वाढीव मतांची नोंद झाली. या नवीन मतदारांची यादी देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. हे मतदार कोण आहेत समजायला हवे. पण, जिल्हाधिकारी यांनी अजूनही यादी दिलेली नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरी पुराव्यानिशी सिद्ध केली आहे. त्यांनी ‘व्होट चोर गद्दी छोड’ हा नारा देत बिहारमध्ये व्होट अधिकार यात्रा काढली आहे. त्याच धर्तीवर नागपूरमध्ये आणि विशेषत: दक्षिण नागपुरातील प्रत्येक ब्लॉकमध्ये मशाल यात्रा काढण्यात येत आहे आणि भाजप ‘चले जाव’ अशी घोषणा दिली जात आहे. आतापर्यंत ब्लॉक ५ आणि ६ मध्ये यात्रा काढली. त्यात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मतचोरी करून भाजप सत्तेत आले आहे, असा दावाही पांडव यांनी केला. लक्ष विचलित करण्यासाठी राजकारण
भाजप सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावत नाही. महागाई, बेरोजगारी, मिहान, एमआयडीसीचे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हिंदू-मुस्लीम, हिंदुस्थान-पाकिस्तान या मुद्यांवर राजकारण सुरू आहे. जातीच्या आधारावर जास्त दिवस राजकारण चालत नाही. युवकांना रोजगार हवा आहे. भाजपने त्यांच्या जाहिरनाम्यातील एकही विषय २०१४ ते २०२४ या काळात हाताळला नाही, याकडे पांडव यांनी लक्ष वेधले.
पाणी, वीज देयक दुप्पट
शहरात महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. नागरिकांना दोन्ही ठिकाणी कर भरावा लागतो. पाण्याचे आणि विजेचे देयक दुप्पट येऊ लागले आहे. महाराष्ट्रात नवीन मीटर बसवण्याचे काम अदानी आणि अन्य दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. त्याला लोकांचा विरोध आहे. ज्या ठिकाणी नवीन मीटर लागले त्या ठिकाणी वीज देयक वाढले आहेत. नवीन मीटर लावताना पैसे घेतले नाहीत, परंतु काही दिवसांनी ती रक्कम देयकात लागून येणार आहे, असेही पांडव म्हणाले.