Contemplation votes Congress meeting ysh 95 | काँग्रेसच्या बैठकीत मतांच्या जुळवाजुळवीवर चिंतन | Loksatta

काँग्रेसच्या बैठकीत मतांच्या जुळवाजुळवीवर चिंतन

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सोमवारी हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसच्या बैठकीत मतांच्या जुळवाजुळवीवर चिंतन

एकाच दिवशी सलग दोन बैठका

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सोमवारी हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन बैठका झाल्या आणि त्यांचे उमेदवार डॉ. रवींद्र भोयर यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी रात्री रविभवन येथील पालकमंत्र्याच्या निवास कक्षात बैठक घेतली. यावेळी मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते. तत्पुर्वी सकाळी येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि मंत्री केदार यांनी बैठक घेतली होती.

भाजपने नगरसेवक पर्यटनाला पाठवले आहे. तर काँग्रेस मतदारांच्या बेरजेत कमी पडल्याचे चित्र होते. परंतु आज अचानक काँग्रेसने बैठकांचा धडका लावण्याचा दिसून आला. यासंदर्भात बोलताना प्रदेश नाना पटोले यांनी आम्ही भाजपसारखा घोडेबाजार करणार नाही. तरी देखील काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. बसपाच्या टीकेवर प्रतिउत्तर देताना बसपाने उत्तर प्रदेशात भाजपशी संगत करून सरकार स्थापन केली होती, याकडे लक्ष वेधले.

संघाचा आयातीत उमेदवार

नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने संघाचा कट्टर स्वयंसेवक आयात केला. काँग्रेसकडे इतके जण असताना संघाच्या भोयर यांना आयात करावे लागले. त्यामुळे काँग्रेसचीही विचारधारा काय ते कळते, म्हणून बसपा विचारधारेच्या मुद्यावर विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ राहणार, अशी भूमिका बसपाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड संदीप ताजने यांनी घेतली.

काँग्रेसची खेळी उलटेल

भाजपचे नगरसेवक स्वमर्जीने पर्यटनाला गेले आहेत. त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही. भाजपचे नगरसेवक संघटीत आहे. एकही मत फुटणार नाही. काँग्रेसने भाजपचा एक नगरसेवक फोडून घाणेरडे राजकारण केले. ही खेळी त्यांच्यावर उलटेल, असा दावा भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या रविभवन येथील कार्यालयात सोमवारी सकाळी बैठक झाली. परंतु यावेळी केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य व भाजपाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता हे देखील या कार्यालयात उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होती. 

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे इम्पिरीकल डेटा मागितला होता पण केंद्राने तो देण्यास नकार दिला. मी विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव मांडला विधानसभेने तो एकमताने मंजूर केला होता,पण केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना ही करत आणि ओबीसींचा इम्पिरीकल डेटाही देत नाही. केंद्र आणि भाजप ओबीसी विरोधी आहेत. त्यांना नागपूर जिल्हा परिषदेत  ओबीसींनी भाजपाला धडा शिकवला पण ते अजून सुधारले नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2021 at 00:31 IST
Next Story
बाबरी प्रकरण: “राम मंदिर दिसतंय पण रामराज्य कुठंय?”; विश्व हिंदू परिषदेच्या माजी अध्यक्षांचा मोदी सरकारला टोला