चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्रात लावण्यात आलेली हजारो वृक्ष देखभालीचे कंत्राट मिळाल्यानंतरही करपली. यात कंत्राटदार दोषी आढळून आले. त्याचा परिणाम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे या कंत्राटदाराला ९५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कंत्राटदार डोंगरे यांना वृक्षलागवडीपासून तर वृक्षांची देखभाल करण्याचे ४८ लाख रुपयांचे काम देण्यात आले. याकाळात वृक्ष जिवंत अथवा मृत झाले, याचा सुगावा सुद्धा वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना लागला नाही. डोंगरे भाजपचे राज्य उपाध्यक्ष आहे. सोबतच वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून काम करतात. युतीचे सरकार काळात सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना शासनाने वृक्ष लागवड अभियानाची घोषणा केली. त्यानंतर सन २०१८-१९ या वर्षासाठी १३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित करण्यात आले. या अभियानंतर्गत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला चाळीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.

हेही वाचा…गडचिरोली : तेंदू व्यवसाय मंदावल्याने नक्षल्यांची आर्थिक कोंडी!

वीज केंद्राने तीन लाख वीस हजार रुपये वनविभागाला दिले. कचराळा अॅश बंड परिसरात या वृक्षांची लागवड करायची होती. या वृक्षांची वाहतूक आणि लागवडीसाठी वीज केंद्राने जुलै २०१८ मध्ये तीन लाख ४५ हजार रुपयांच्या प्रत्येक दोन निविदा काढल्या. यातील एक डोंगरे यांच्या मे. श्रीराम एंटरप्राईजेसला आणि दुसरी भाजपचे पदाधिकारी असलेल्या हनुमान काकडे यांना मिळाली. वृक्ष लागवडीचे काम ऑगस्ट – २०१८ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर पुन्हा वृक्ष लागवडीच्या देखभालसाठी नोव्हेंबर-२०१८ मध्ये निविदा काढण्यात आली. ते १३ लाख ६ हजार रुपयांचे काम होते. याही वेळी डोंगरे यांनाच ते काम मिळाले. डिसेंबर २०१९ मध्ये ते काम संपले. त्यानंतर पाळीव जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी निविदा काढण्यात आली. ते १६ लाख २७ हजारांचे काम डोंगरे यांच्याच पदरी पडले. ते केवळ सहा महिन्यांचे काम होते. जुलै २०२० मध्ये ते संपले. त्यानंतर पुन्हा जुलै २०२० मध्ये वृक्षांच्या देखभालीसाठी १२ लाख ७७ हजार रुपयांची निविदा काढण्यात आली. तेही काम डोंगरेच यांना देण्यात आले. ते काम जुलै २०२१ मध्ये संपले.

हेही वाचा…२५ मते जास्त आढळली, मतदानातील फरकाबाबत अखेर नोटीस; वाचा कुठे घडला हा प्रकार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन वर्ष वृक्षाची देखभाल करण्याचे काम डोंगरे यांच्याकडे होते. याकाळात हजारो वृक्ष करपली. मात्र, वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना तक्रारी नंतर सुद्धा याची दखल घेतली नाही. उलट प्रत्येकी वेळी डोंगरे यांच्यावर मर्जी दाखवित गेले. आता सर्व देयक अदा झाल्यानंतर दंड ठोठाविण्याची औपचारिकता वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी पार पाडली आहे. ९ मे रोजी २०२४ ला एक पत्र काढले. यात वीज केंद्राच्या सिव्हील विभागाकडून वृक्षारोपणात झालेल्याच भ्रष्टाचाराची चौकशी करुन कंभाटादर झालेल्या खर्चाची वसूल करण्याचे आदेश दिले आहे. डोंगरे यांच्यावर नाममात्र ९५ हजारांचा दंड ठोठाविला आहे. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे झाड दगावली, असे डोंगरे आता माध्यमांशी सांगत आहे. विशेष म्हणजे, भाजपचे डोंगरे हे मुनगंटीवार यांचे अतिशय विश्वासू आहे. मात्र, त्यांनीच मुनगंटीवार यांच्या वृक्ष लागवडीच्या संकल्पनेला हरताळ फासल्याची चर्चा आहे.