बुलढाणा : एरवी शांत, संयमी समजल्या जाणाऱ्या ख्रिस्ती बांधवात अनेक वर्षानंतर सात्विक संताप दिसून आला. एरवी आपल्या कामाशी काम, कोणत्याही विषयावर व्यक्त न होण्याची आणि राजकारणापासून दूर राहणाऱ्या या समुदायाला आज मात्र रस्त्यावर उतारावे लागले. जिल्हा मुख्यालयी निषेध मोर्चा काढावा लागला. याला कारण ठरले, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल भाजप पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना योग्य ती समज द्यावी, त्यांच्या पदाचा ( आमदारकीचा) राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
स्थानिय साने नगर परिसरातील चर्च ऑफ नाझरीन येथून या मोर्च्याला शांततेत प्रारंभ झाला. रेव्हरंड सुहास गुर्जर, रेव्हरंड विजय पलघामोल, बोरघाटे, सोनारे, गायकवाड, बाबुराव डोंगरदिवे, पास्टर हर्षानंद डोंगरदिवे, बोरकर, खंडारे, कांबळे, जगदीश शिंदे, पाटोळे यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील शेकडो धर्म बांधव सहभागी झाले. मोर्च्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. चर्च मार्ग कारंजा चौक, जिल्हा न्यायालय मार्ग, बिएसएनल कार्यालय या मार्गाने निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन सादर केले.
बुलढाण्यात ऐरवी काढण्यात येणाऱ्या आक्रमक मोर्च्याच्या तुलनेत हा मोर्चा वेगळा ठरला. निषेध मोर्चा असला तरी अत्यंत शांततेत, संयम ठेवून हा मोर्चा काढण्यात आला. कोणताही आक्रस्ताळेपण न करता, आक्रमक घोषणा न देता हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात येशू ख्रिस्त जिंदाबाद ही एकमेव घोषणा देण्यात आली. भगवान येशू ख्रिस्त तारणारा आणि अपराध्याला क्षमा करणारा आहे. भाजप नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी व योग्य ती कारवाई करावी, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी मागणी करीत मोर्चेकरी ख्रिस्ती समुदायने आपला सात्विक संताप व्यक्त केला. यात ख्रिस्ती बंधू, भगिंनीसह जिल्ह्यातील धर्मगुरू देखील सहभागी झाले होते.