अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : वृद्धापकाळात आजोबाचे नातवाशी मित्रत्वाचे संबंध निर्माण होतात तर आजोबालाही नातवाच्या रूपात त्याचे बालपण परत मिळत असते. त्यामुळे आजोबा आणि नातवाच्या नात्यात कधीच दुरावा येत नाही. परंतु, मुलाच्या अकाली मृत्युमुळे सुनेने दुसरे लग्न केले आणि प्राणाहूनही प्रिय असलेल्या नातवाशी असलेला संवादही संपला. उदास आणि हताश झालेल्या आजोबाला एक-एक दिवस जगणे कठिण होत असताना त्यांच्या मदतीला भरोसा सेल देवदूत बनून आले. खाकीतील माणुसकीने आजोबा आणि नातवाशी असलेल्या नात्यात आनंद पेरून पुन्हा त्यांची भेट घडवून आणली.

कुमार गजानी (७०) हे पत्नी निलू (६५) सोबत महालमध्ये राहतात. त्यांचा एकुलता मुलगा कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला होता. मोठ्या थाटामाटात त्याचे लग्न लावून दिले. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. सुनेलाही सासरी स्वतःच्या मुलीप्रमाणे जपले. वर्षभरानंतर घरात बाळाचे आगमन झाले. आजी निलू आणि आजोबा कुमार यांच्या सहवासात नातू बंटी वाढत गेला. आजोबाशी बंटीची एवढी गट्टी जमली की तो आईवडिलांऐवजी आजोबांसोबतच राहायचा. दुर्दैवाने २०१९ मध्ये मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गजानी दाम्पत्याचा वृद्धापकाळातील आधार हरवला. न पचविता येणाऱ्या दुःखाचा डोंगर पेलून गजानी दाम्पत्य कसेतरी या धक्क्यातून सावरले. सुनेलाही मुलीप्रमाणे सांभाळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी जुळवाजुळव केली.

सुनेचा लग्नाचा निर्णय, अन नातवाचा विरह

पतीच्या निधनाने झालेल्या दुःखातून सावरत सुनेने काही दिवसांतच नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. सासू-सासऱ्यांनी सुनेच्या भावनांचा आदर केला. काही दिवसांतच सुन लग्न करून मुलासह पतीच्या घरी निघून गेली. सुनेच्या लग्नानंतर नातूही घरातून गेल्यामुळे त्यांना अतीव दु:ख झाले. नव्याने संसार थाटताच सुनेने मुलाचे आजोबाशी बोलणे थांबविले. फोन केल्यास प्रतिसाद मिळत नव्हता. नातवाला डोळ्यांनी बघणे तर दूरच फोनवर आवाजही ऐकायला मिळत नव्हता. त्यामुळे वृद्ध जीवांची घालमेल होत होती. आजोबा-आजी भरोसा सेलमध्ये आले. त्यांनी पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांची भेट घेत आपली अगतिगता मांडली. सूर्वे यांनी पोलीस कर्मचारी विद्या जाधव हिच्यासह कायद्याच्या चौकटीत राहून सकारात्मक प्रयत्न केले. सुनेची समजूत घातली. सुनेने लगेच होकार दिला. आजोबाने संवाद साधण्यासाठी मोबाईल हातात घेतला. फोनवरून बंटीचा आवाज ऐकताच आजोबाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. ‘दादाजी.. मैं भी आपको बहोत मिस करता हूं…’ असे शब्द कानी पडताच आजोबा पुन्हा गहिवरले. पण, नातवाचा आवाज ऐकता आला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.